ढिंग टांग : मफत अने नया बेपार…!
esakal January 30, 2026 12:45 PM

स्थळ : ७, लोककल्याण मार्ग, न्यू डेल्ही. वेळ : बप्पोरे.

निवासस्थानाच्या पायऱ्यांवर माननीय मोटाभाई गुडघे चोळत वाट पाहात बसले आहेत. पार्श्वभूमीला रेडिओवर ‘भूलेबिसरे गीत’ हा गीतमालेचा कार्यक्रम सुरू आहे. ‘अच्छे दिन आनेवाले है’ हे प्राचीन काळीचे सुपरहिट गीत वाजत आहे. वंदनीय नमोजीभाई बगीच्यातील मोराटोरांना दाणे खिलवत अर्थशास्त्र शिकवत आहेत. पोरेटोरे असतात, तसे दिल्लीत मोरबिर असतात. दिल्लीतले मोर महा डांबिस! चोरावर मोरच!! दाणे खात खात त्यांची शिकवणी सुरु आहे. २७ युरोपियन देशांशी केलेल्या कराराचा महिमा त्यांना ऐकून घ्यावा लागत आहे. अब आगे…

नमोजीभाई : (मोरांना बोलावत) ऑ…ऑ…ऑ…अरे आवो ने गधेडा! तमे मोर छो के मर्घो? तद्दन मरघीजेवा लागे छे…!

मोटाभाई : (चाचरत) आ तो मर्घोज छे...!

नमोजीभाई : (चमकून मोटाभाईंकडे बघत) क्या रे आव्या? शुं काम?

मोटाभाई : (उजळलेल्या चेहऱ्याने) युरोप ना डील तो एकदम चोक्कस थई गया! आपडे ट्रम्पतात्यानां सूपडा साफ थई गया…! बहु सरस! बहु सरस!

नमोजीभाई : (गुप्त भाषेत गोपनीय बाब सांगत) डोलांडतात्याचा कालच फॉन आला होता! ओगणीस वेळा त्याने कॉल केला, मी घेतलाज नाय!!

मोटाभाई : (चिंताग्रस्त चेहऱ्याने) तात्या भडकला नाय के?

नमोजीभाई : (गोपनीय लँग्वेज कंटिन्यू…) भडकला? लई कोकलत होता! मने कहे छे, ‘‘ ए, हल्लोऽऽ…माय डिअर फ्रँड नारिंद्रा? व्हाट डिड यु डू? यु मेस्ड एव्हरीथिंग!! बिकाज ऑफ यु, आय मिस्ड नोबेल प्राइज! नाऊ धिस फ्री ट्रेड डील?...आ शुं किधु तमे? एटला पण सबर नथी? मी टॅरिफ लावला तर एकदम युरोपियन युनियनशी मफत बेपार कशाला करते? हवे मारा तो काम तमाम थई गया ने?’’

ढिंग टांग : तुम जिओ हजारो साल…!

मोटाभाई : (विजयी सुरात) शेर ने माथे सवासेर..! हाहाहा!! जिओ, जिओ!!

नमोजीभाई : (गोपनीय भाषेत कंटिन्यू…) हाऽऽ…एकदम चोक्कस डील झ्याला! एकाज फटक्यात २७ तारखेला २७ देशांबरोबर फ्री ट्रेड करार करुन टाकला! सौ सुनार की एक लुहार की!! अरे, मोदी छे, तो बध्दा मुमकीन छे!!

मोटाभाई : (निरागसपणाचा कळस…) युरपना मार्केट खुलो थई गयो!! कर लो दुनिया मुठ्ठी में..!! तमे लिस्बनना गांधीने मळ्या?

नमोजीभाई : (एकदम आठवून) अरे हां…युरोपिय काऊन्सिलच्या प्रेसिडेण्ट हाय ने अंतोनियो कॉस्टा! तेला मी ‘लिस्बनच्या गांधी’ ही पदवी देऊन टाकली!! बहु सज्जन माणस छे! आपडा गोवानुंज छे! मने कहे छे, कितें रें, द्येव बरे करो!!

मोटाभाई : (थक्क होत) लिस्बनना गांधी गोवानुं छे? शुं कहे छे…मने तो खबरज नथी!!

नमोजीभाई : (टाळी देत) पोर्तुगालच्या भूतपूर्व पीएम गोवन हता, आ वात मज्जानुं छे ने?

मोटाभाई : (मूळ विषयाकडे वळत) मफत बेपार करार तो थई गया! हवे आगळ शुं प्लान छे?

नमोजीभाई : (छप्पन इंची आत्मविश्वासाने) …अमेरिकेज्या टॅरिफच्या मी बेंडबाज्या वाजवून टाकला! आपला देश आता विकसित होणार! आय ॲम अ ट्रू बिझनेसमन यु नो!!

मोटाभाई : (विचारात पडून गुडघे चोळत) विकसित भारत बनाव्या माटे केटला टाइम लागीश?

नमोजीभाई : (खांदे उडवत) कराराची अंमलबजावणी व्हायला पाच-दहा वरस तर ज्याणार!!

मोटाभाई : (सुस्कारा सोडत) चोक्कस! आ टाइम मां आपडी चूंटणी थई जईश! कछु वांधो नथी! आव जो!!

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.