संगमेश्वर तालुक्यात ६३ उमेदवार रिंगणात
esakal January 30, 2026 12:45 PM

संगमेश्वरात ६३ उमेदवार रिंगणात
अपक्षांचे बंड शमले; कोसुंब गटातील लढत चुरशीची
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. २९ ः संगमेश्वर तालुक्यात जिल्हा परिषदेच्या आठ आणि पंचायत समितीच्या १६ जागांसाठी ६३ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. अपक्ष उमेदवारांनी अखेरच्या क्षणी अर्ज मागे घेतल्यामुळे बंड शमले आहे.
संगमेश्वर तालुक्यात कोसुंब गटातील लढत चुरशीची ठरणार आहे. या ठिकाणी शिंदेसेनेचे रोहन बने, भाजपचे प्रमोद अधटराव व ठाकरेसेनेच्या मुग्धा जागुष्टे यांच्यात सामना रंगणार आहे. तिन्ही दिग्गज उमेदवार असून, ही लढत प्रतिष्ठेची झाली आहे. याच गटात काँग्रेसकडून चंद्रकांत मोरे हे निवडणूक रिंगणात आहेत. धामापूरतर्फे संगमेश्वर गटात अजित कांबळे (वंचित बहुजन आघाडी), सहदेव बेटकर (ठाकरेसेना), सुशील भायजे (राष्ट्रवादी अजित पवार गट) व जगन्नाथ राऊत (अपक्ष) हे निवडणूक रिंगणात आहेत. कडवई गटात माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष संतोष थेराडे (ठाकरेसेना), विनोद म्हस्के (भाजप) व आशिष सुर्वे (काँग्रेस) यांच्यात लढत होणार आहे. कसबा संगमेश्वर गटात विशाखा कुवळेकर (ठाकरे सेना) व रचना महाडीक (शिंदेसेना) यांच्यात थेट लढत होणार आहे. मुचरी गटात माधवी गीते (शिंदेसेना), ललिता तांबे (ठाकरे सेना) व नुपुरा मुळ्ये (अपक्ष) या निवडणूक रिंगणात आहेत. साडवली गटाच्या लढतीकडे सर्वांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. भाजपच्या रूपाली कदम व ठाकरे सेनेच्या नेहा माने यांच्यात थेट लढत होणार आहे. दाभोळे गटात विलास चाळके (शिंदेसेना) व विरश्री बेटकर (वंचित बहुजन आघाडी) एकमेकांच्या विरोधात ठाकले आहेत.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.