शरद पवारांच्या खासदारकीचा 2 एप्रिल शेवटचा दिवस, त्यापूर्वी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भात काय ठरलं होतं? इनसाईड स्टोरी अखेर समोर आली!
डॉ. कृष्णा केंडे January 30, 2026 02:13 PM
NCP merger: गेल्या काही महिन्यांपासून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार याची चर्चा रंगली होती; इतकेच नव्हे तर अजित पवार आणि शरद पवार यांच्यामध्ये वाढलेली जवळीक आणि त्यांच्या भेटीगाठी सुद्धा बरंच काही सांगून जात होत्या. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनाने दोन्ही राष्ट्रवादीमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे. राष्ट्रवादीची दोन शकले झाली असली तरी अजित पवारांना मानणारे दोन्हीकडेही नेते आहेत. कुटुंबामधील राजकीय दरी सुद्धा कमी झाली होती. जे रोहित पवार, खासदार सुप्रिया सुळे अजित पवारांच्या विरोधात आक्रमकपणे बोलत होते, त्यांनी गेल्या काही महिन्यांपासून तलवार म्यान केली आहे. मलिदा गँग असाच उल्लेख रोहित पवार यांच्याकडून केला जात होता. मात्र, आता मलिदा गँग वगैरे असा उल्लेख न करता काका अजित पवारांच्या मदतीला धावून येत असल्याचे चित्र निर्माण झाले होते. 

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा

त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावर चर्चा रंगली होती. महानगरपालिकेत निवडणुकीमध्येही दोन्ही राष्ट्रवादीने एकत्रित येऊन निवडणूक सुद्धा लढली होती. यामध्ये एकमेकांचे उमेदवार सुद्धा एकमेकांच्या चिन्हांवर निवडणूक लढताना दिसून आले. त्यामुळे आता या दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासाठी केवळ औपचारिकता बाकी आहे अशीच चर्चा रंगली होती. मात्र, आता अजित पवार यांच्या धक्कादायक निधनाने या सर्वांवर पाणी फेरलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून केवळ अजित पवार हेच चर्चेमध्ये सामील होते, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून स्वतः शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, जेष्ठ नेते जयंत पाटील यांच्यासह खासदार अमोल कोल्हे शशिकांत शिंदे हे सुद्धा चर्चेमध्ये सहभागी होते. 

सुप्रिया सुळे पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष होणार होत्या

दुसरीकडे, दरम्यान दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यानंतर कोणता मसुदा निश्चित करण्यात आला होता या संदर्भात सुद्धा माहिती समोर आली आहे. राष्ट्रवादीमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 2 एप्रिल रोजी शरद पवार यांच्या राज्यसभेच्या खासदारकीचा कार्यकाळ संपुष्टात येत आहे. त्याच दिवशी शरद पवार सक्रिय राजकारणातून निवृत्त होणार होते. त्यानंतर सुप्रिया सुळे या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष होणार होत्या. तसेच केंद्रामध्ये त्यांना मंत्रीपद दिले जाणार होते. दुसरीकडे, राष्ट्रवादी फुटीचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयांमध्ये अजूनही प्रलंबित आहे. या संदर्भातील सुनावणी पुढील महिन्यामध्ये होणार होती. त्यानंतर दोन्ही पक्ष एकत्र येणार होते, अशी माहिती राष्ट्रवादीच्या विश्वसनीय सूत्रांनी दिली.

सुप्रिया सुळे केंद्रामध्ये मंत्री होतील

गेल्या काही दिवसांपासून सुप्रिया सुळे केंद्रामध्ये मंत्री होतील, तर अजित पवार राज्यामध्ये राष्ट्रवादीचे नेतृत्व करतील. मात्र, आता अजित पवार यांच्या धक्कादायक निधनामुळे सुप्रिया सुळे नेतृत्व करणार की सुनेत्रा पवार राज्यामध्ये नेतृत्व स्वीकारणार याकडे सुद्धा लक्ष असेल. आता राष्ट्रवादीचे नेतृत्व कोण करणार यासंदर्भातील निर्णय पवार कुटुंबीय एकत्रित बसूनच घेणार आहेत. यासंदर्भातील चेंडू हा पूर्णतः शरद पवार यांच्या कोर्टात गेला आहे.  

इतर महत्वाच्या बातम्या

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.