'सुनेत्रा पवार यांनाच उपमुख्यमंत्री करा' राष्ट्रवादीच्या नेत्यांचा सीएम फडणवीसांना प्रस्ताव, रात्री भेटल्यानंतर आज पुन्हा 'वर्षा'वर पोहोचले! तर राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी...
निलेश बुधावले, एबीपी माझा January 30, 2026 03:13 PM

NCP leaders proposal to CM devendra Fadnavis: उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बारामतीमध्ये झालेल्या भीषण अपघातानंतर त्यांची अकाली एक्झिट झाली. दादांच्या निधनाने राष्ट्रवादीमध्ये नेतृत्वाची मोठी पोकळी निर्माण झाली आहे. इतकेच नव्हे तर महायुती सरकारमध्ये अजित पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्री पदासह अर्थ, उत्पादन शुल्क आणि क्रीडा खात्याचा कारभार होता. त्यामुळे आता या खात्यांचा कारभार कोणाकडे द्यायचा आणि पक्षाचे राष्ट्रीय नेतृत्व कोणाकडे द्यायचं याची चर्चा राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये सुरू आहे.  दरम्यान, दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा शिगेला पोहोचली असतानाच आता अजित पवार यांच्या पक्षांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा अस्तित्व स्वतंत्र ठेवण्याचा प्रस्ताव राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेत्यांचा असल्याचे समोर आलं आहे. 

राष्ट्रीय अध्यक्षपदी प्रफुल पटेलांची नियुक्ती करण्यात यावी 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सध्या कार्याध्यक्ष असलेले प्रफुल पटेल यांची नियुक्ती करण्यात यावी आणि उपमुख्यमंत्रीपदी सुनेत्रा पवार यांचीच नियुक्ती करण्यात यावी असा प्रस्ताव राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून समोर आला आहे. दरम्यान उपमुख्यमंत्रीपदासाठी सुनेत्रा पवार यांच्याच नावावर शिक्कामोर्तब करण्यात यावे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी आज वर्षा निवासस्थानी जाऊन देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार आहेत. यासाठी ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, प्रफुल पटेल, सुनील तटकरे वर्षा निवासस्थानी पोहोचले आहेत. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्षपदी प्रफुल पटेल यांना नेमण्यात यावं असा प्रवाह पक्षांमध्ये असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यापेक्षा राष्ट्रवादीमध्ये नेत्यांची भूमिका वेगळी चूल ठेवण्याकडे  असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, विलिनीकरणाची चर्चा अजित पवार हयात असताना सुरू होती त्या चर्चेवर अंतिम निर्णय शरद पवार घेणार आहेत अशी माहिती सुद्धा समोर येत आहे.

अजित पवार यांना विद्या प्रतिष्ठानमध्ये अंतिम निरोप देण्यात आल्यानंतर अजित पवार यांच्या सहयोग बंगल्यावर सुनेत्रा पवार यांच्याशी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी चर्चा केली होती. या बैठकीमध्ये पार्थ पवार सुद्धा उपस्थित होते. त्यांनी सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्रीपदी संधी देण्यात यावी, तर आपल्याला राज्यसभेवर पाठवण्यात यावं असा प्रस्ताव दिला होता. आता या संदर्भात राष्ट्रवादीकडून कोणता निर्णय घेतला जातो याकडे लक्ष असेल. 

इतर महत्वाच्या बातम्या

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.