Arijit Singh: अरिजीत सिंहने ‘या’ कारणासाठी सोडलं पार्श्वगायन; जवळच्या व्यक्तींनीच सांगितलं सत्य
admin January 30, 2026 03:25 PM
[ad_1]

देशातील सर्वांत लोकप्रिय गायकांपैकी एक, पार्श्वगायनाच्या विश्वातील प्रसिद्ध नाव, अनेक सुपरहिट गाण्यांना आपला देणारा गायक अरिजीत सिंह… याने जेव्हा मंगळवारी (27 जानेवारी 2026) संध्याकाळी सोशल मीडियावर पोस्ट लिहित पार्श्वगायनातून निवृत्ती जाहीर केली, तेव्हा सर्वांनाच मोठा धक्का बसला. अरिजीतने या पोस्टमध्ये असंही स्पष्ट केलं होतं की संगीत विश्वाशी त्याचं नातं कायम राहील आणि यापुढेही तो संगीत निर्मिती करत राहील. परंतु तो चित्रपटांमध्ये पार्श्वगायन करणार नाही. ज्या पार्श्वगायनाने अरिजीत सिंहला फक्त देशभरातच नाही जगभरात ओळख आणि प्रसिद्धी मिळवून दिली, त्याला त्याने अवघ्या वयाच्या 40 व्या वर्षीच सोडण्याचा इतका मोठा निर्णय का घेतला?

अनुराग बासू यांनी सांगितलं कारण

अरिजीतने दिग्दर्शक अनुराग बासू यांच्या ‘बर्फी’, ‘जग्गा जासूस’, ‘ल्युडो’, ‘मेट्रो इन दिनों’ यांसारख्या चित्रपटांमधील अनेक गाणी गायली आहेत. त्यापैकी काही गाणी हिटसुद्धा ठरली आहेत. अरिजीतच्या या निर्णयाबद्दल ‘बीबीसी’ला दिलेल्या मुलाखतीत अनुराग बासू म्हणाले, “जगभरातील लोक जरी त्याच्या या निर्णयावर आश्चर्य व्यक्त करत असले तरी मी त्याच्या या निर्णयाने अजिबातच चकीत झालो नाही. अरिजीत किती प्रतिभावान गायक आहे आणि त्याला आयुष्यात फक्त गायनापेक्षा बरंच काही करायचं आहे, हे मला फार आधीपासूनच माहीत आहे. अरिजीतला चित्रपट निर्मितीचीही प्रचंड आवड आहे. मी ‘बर्फी’ हा चित्रपट बनवत असतानाही अरिजीने मला सहाय्यक म्हणून काम देण्याचा आग्रह केला होता. त्याला मुलांसाठी शाळाही सुरू करायची आहे, त्यांच्यासोबत खूप वेळ घालवायचा आहे. असे त्याचे इतरही काही प्लॅन्स आहेत, ज्यामधून आपल्याला त्याचं एक वेगळं रुप पहायला मिळेल.”

चित्रपट दिग्दर्शनात अरिजीतला रस

‘बीबीसी न्यूज’ने दिलेल्या वृत्तानुसार, अरिजीत सिंहने दिग्दर्शकाच्या भूमिकेतून त्याच्या पहिल्यावहिल्या हिंदी चित्रपटासाठी कामाला सुरुवात केली आहे. हा एक जंगल अॅडव्हेंचर चित्रपट असेल आणि त्यामध्ये नवाजुद्दीन सिद्दिकी मुख्य भूमिकेत झळकणार आहे. या चित्रपटाची शूटिंग सध्या शांती निकेतनमध्ये सुरू आहे. या चित्रपटाला अरिजीत सिंह आणि त्याची पत्नी कोयल सिंह यांनी संयुक्तरित्या लिहिलं आहे. “अरिजीतला फिल्म मेकिंगचं खूप ज्ञान आहे”, असं अनुराग बासू यांनीही सांगितलं आहे. अरिजीतने त्याच्या सुरुवातीच्या करिअरमध्ये प्रसिद्ध संगीतकार प्रीतम यांच्याकडे सहाय्यक म्हणून काम करून संगीतातील बारिकसारिक गोष्टी शिकल्या होत्या. प्रीतमने ‘बर्फी’, ‘ये जवानी है दिवानी’, ‘जग्गा जासूस’, ‘तमाशा’, ‘ऐ दिल है मुश्कील’ आणि ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटातील संगीतबद्ध केलेली गाणी अरिजीतने गायली असून ती सुपरहिट ठरली आहेत. प्रीतम आणि अरिजीत सिंह ही संगीतकार-गायकाची जोडी अत्यंत यशस्वी मानली जात होती. अरिजीतने प्रीतमशिवाय शंकर-एहसान-लॉय, विशाल-शेखर, मिथुन, माँटी शर्मा यांसारख्या संगीतकारांसोबतही काम केलंय.

मुंबईत नाही तर पश्चिम बंगालमध्ये वास्तव्य

बॉलिवूडमध्ये आपल्या हिट गाण्यांनी छाप सोडणारा अरिजीत सिंह मुंबईत राहत नाही. तर तो पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद इथं राहतो. तिथे तो त्याची पत्नी कोयल आणि दोन मुलांसोबत राहतो. तिथूनच तो त्याचं गायनातील करिअर, काही वर्षांपूर्वी सुरू केलेली म्युझिक कंपनी आणि फिल्म प्रॉडक्शन हाऊस यांच्या जबाबदाऱ्या सांभाळतो. त्याने मुर्शिदाबाद इथल्या त्याच्या वडिलोपार्जित घरातच रेकॉर्डिंग स्टुडिओ सेट-अप केला आहे. गेल्या काही वर्षांपासूनच तो तिथूनच त्याची गाणी रेकॉर्ड करतोय. नुकतंच सलीम-सुलेमान या संगीतकार जोडीने त्याच्या तिथल्याच स्टुडिओमध्ये जाऊन अरिजीतच्या आवाजात एक गाणं रेकॉर्ड केलं होतं.

अरिजीत सिंह आणि त्याची पत्नी कोयल रॉय

सुलेमान म्हणाले, “फिल्म मेकिंग हे अरिजीतचं खूप जुनं स्वप्न आहे आणि आता त्याला त्यावर पूर्ण लक्ष केंद्रीत करायचं आहे. तो अत्यंत महत्त्वाकांक्षी असून त्याच्या या निर्णयाचा मी खूप आदर करतो.” अरिजीतवर सत्यजित रे यांच्या चित्रपटांचा खूप प्रभाव आहे आणि काही वर्षांपूर्वी त्याने त्याचे संगीत गुरू राजेंद्र प्रसाद हजारी यांच्या जीवनावर आधारित एका बंगाली चित्रपटाची निर्मिती केली होती. या चित्रपटाचं दिग्दर्शनसुद्धा त्यानेच केलं होतं.

अरिजीत सिंहचा कौटुंबिक मित्र आणि मुर्शिदाबादचे रहिवासी अनिलव चॅटर्जी म्हणाले, “सध्या अरिजीत एका हिंदी आणि बंगाली चित्रपटाच्या निर्मितीत व्यक्त आहे. या दोन्ही चित्रपटांचं शूटिंग पश्चिम बंगालच्या वेगवेगळ्या भागात सुरू आहे. अरिजीत हा जितका उत्साही गायक आणि संगीतकार आहे, तितकाच तो एक उदार व्यक्ती आहे. स्थानिक पातळीवर गरजू लोकांना मदत करण्यात तो नेहमीच आघाडीवर असते.”

‘फेम गुरुकुल’पासून प्रवासाची सुरुवात

अरिजीत सिंहने वयाच्या 18 व्या वर्षी 2005 मध्ये ‘फेम गुरुकुल’ या गायनाच्या रिअॅलिटी शोमध्ये भाग घेतला होता. या शोमध्ये गीतकार जावेद अख्तर, संगीतकार शंकर महादेवन आणि गायक केके हे परीक्षक होते. दुर्दैवाने अरिजीत हा शो जिंकू शकला नव्हता. तेव्हा परीक्षक जावेद अख्तर यांनी म्हटलं होतं की, “हे तुझं कमी आणि शोचं अधिक नुकसान आहे.” त्यानंतर 2011 मध्ये अरिजीत सिंहला बॉलिवूड चित्रपटात पहिला ब्रेक मिळाला होता. इमरान हाश्मीची मुख्य भूमिका असलेल्या आणि मोहित सुरी दिग्दर्शित ‘मर्डर 2’ या चित्रपटातील अरिजीतच्या आवाजातील ‘फिर मोहब्बत’ हे गाणं तुफान हिट झालं होतं. या गाण्याच्या यशानंतर अरिजीत सिंहला असंख्य ऑफर्स मिळू लागले. 2013 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘आशिकी 2’ या चित्रपटातील ‘तुम ही हो’ या गाण्याने अरिजीतला टॉप गायकांच्या रांगेत आणून उभं केलं.

‘फिर मोहब्बत’, ‘तुम ही हो’, ‘फिर ले आया दिल’, ‘बदतमीज दिल’, ‘कबीरा’, ‘इलाही’, ‘ऐ दिल है मुश्कील’, ‘चन्ना मेरेया’, ‘कलंक’, ‘केसरियाँ’, ‘कभी जो बादल बरसे’ यांसारख्या गाण्यांमुळे अरिजीतला प्रचंड यश मिळत गेलं. तरुणवर्गात तो सर्वांत लोकप्रिय गायक ठरला. इन्स्टाग्राम रील्स, युट्यूब, स्पॉटिफाय या सर्व प्लॅटफॉर्म्सवर अरिजीतची गाणी सर्वाधिक स्ट्रीम होऊ लागली.

अरिजीतला दोन वेळा राष्ट्रीय पुरस्कार आणि आठ वेळा फिल्मफेअर पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत. 2005 मध्ये त्याला भारत सरकारने पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केलं होतं. 2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘पद्मावत’ या चित्रपटातील ‘बिन्ते दिल’ या गाण्यासाठी अरिजीतने पहिला राष्ट्रीय पुरस्कार जिंकला होता. या गाण्याला खुद्द भन्साळींनीच संगीतबद्ध केलं होतं. आश्चर्याची बाब म्हणजे 2007 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘सांवरिया’ या चित्रपटातील एक गाणं भन्साळींनी अरिजीतच्या आवाज रेकॉर्ड करून घेतलं होतं. परंतु नंतर त्यांनी ते हटवून दुसऱ्या गायकाकडून पुन्हा रेकॉर्ड करून घेतलं होतं. 2022 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटातील ‘केसरियाँ’ या गाण्यासाठी त्याला दुसऱ्यांदा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्यावर हे गाणं चित्रित करण्यात आलं होतं.

सलमान खानसोबतचा वाद आणि पॅचअप

अरिजीत सिंह लाइमलाइटपासून दूर राहणारा, मितभाषी, फक्त आपल्या कामावर लक्ष केंद्रीत करणारा म्हणून ओळखला जातो. यामुळेच तो फारशा मुलाखती देत नाही किंवा पत्रकारांशी फार बोलत नाही. असं असलं तरी त्याच्या करिअरमधील सर्वांत मोठी कॉन्ट्रोव्हर्सी ही अभिनेता सलमान खानसोबत झाली होती. 2014 मध्ये एका पुरस्कार सोहळ्यात सलमानने अरिजीतला सन्मानित करण्यासाठी मंचावर बोलावलं होतं. जेव्हा अरिजीत मंचावर पोहोचला, तेव्हा सलमानने मस्करीत त्याला विचारलं की, “झोपला होतास का?” हे ऐकून सूत्रसंचालन करणाऱ्या सलमानला अरिजीत म्हणतो, “तुम्ही लोकांनी झोपवूनच टाकलं.” स्टेजवर झालेल्या मजामस्करीमुळे सलमान आणि अरिजीत यांच्यात वितुष्ट निर्माण झालं.

या वादादरम्यान सलमान खानची सर्व गाणी अरिजीत नाही तर दुसऱ्या गायकांकडून रेकॉर्ड केल्या जात असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. सलमानच्या ‘सुलतान’ या चित्रपटातील ‘जग घुमेया’ हे गाणं मूळ अरिजीतच्या आवाजात रेकॉर्ड करण्यात आलं होतं. परंतु वादामुळे सलमानने पाकिस्तानी गायक राहत फतेह अली खान यांच्याकडून पुन्हा रेकॉर्ड करून घेतलं आणि चित्रपटात त्यांचंच व्हर्जन वापरण्यात आलं होतं. विशेष म्हणजे त्याआधी अरिजीतने सोशल मीडियावरील एका पोस्टद्वारे सलमानला त्याने गायलेलं गाणं न बदलण्याची विनंतीसुद्धा केली होती. अरिजीतने सलमानची माफीसुद्धा मागितली होती. तरीही त्यानंतर बराच वेळ सलमान त्याच्या मनात राग धरून होता.

अखेर जवळपास सात वर्षांनंतर हा वाद संपुष्टात आला आणि अरिजीतने सलमानच्या ‘टायगर 3’ या चित्रपटासाठी गाणं रेकॉर्ड केलं. अरिजीतसंदर्भात गैरसमज झाल्याचं सलमानने नंतर मान्य केलं. येत्या 17 एप्रिल रोजी प्रदर्शित होणाऱ्या सलमानच्या आगामी ‘द बॅटल ऑफ गलवान’ या चित्रपटातील ‘मातृभूमी’ हे गाणंसुद्धा अरिजीत सिंहने गायलं आहे.


[ad_2]
Source link
© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.