Marathi Movie: शिवरायांच्या शौर्य आणि बुद्धिमत्तेचा इतिहास रुपेरी पडद्यावर; रणपति शिवराय या दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला
Saam TV January 30, 2026 04:45 PM

Ranapati Shivray Swari Agra: शौर्य, जिद्द, चातुर्य आणि असामान्य नियोजन कौशल्याच्या बळावर छत्रपती शिवाजी महाराजांनी असंख्य संकटांवर मात करत स्वराज्याची स्थापना केली. मोठमोठ्या शत्रूंना पराभूत करत त्यांनी इतिहासात अढळ स्थान निर्माण केले. औरंगजेबासारख्या बलाढ्य आणि कपटी शत्रूला पुरून उरणारे नेतृत्व छत्रपती शिवाजी महाराजांकडे होते. महाराजांच्या नेतृत्वगुणांचा, स्वाभिमानाचा आणि राष्ट्रनिष्ठेचा जाज्वल्य इतिहास असलेली ‘आग्रा भेट’ आता ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ या भव्य चित्रपटाच्या माध्यमातून मराठी रुपेरी पडद्यावर साकार होत आहे.

स्वराज्य उभारणीच्या प्रवासात छत्रपती शिवाजी महाराजांना अनेकदा जीवावर बेततील अशा संकटांचा सामना करावा लागला. मात्र, अखंड सावधगिरी, बुद्धी आणि अचूक नियोजनाच्या जोरावर त्यांनी प्रत्येक संकटावर विजय मिळवला. ‘आग्रा स्वारी’ नेमकी कशी झाली, महाराजांनी तिचे नियोजन कसे केले आणि औरंगजेबासारख्या दगाबाज बादशहाला त्यांनी कशा प्रकारे आव्हान दिले, याचा थरारक आणि प्रेरणादायी प्रवास या चित्रपटातून उलगडणार आहे. केवळ बळावर नव्हे, तर बुद्धी आणि रणनीतीवर विजय अवलंबून असतो, हे महाराजांनी या ऐतिहासिक प्रसंगातून सिद्ध केले.

Shahrukh Khan: चष्मा काढायला लावला, आयडी बघितला...; एयरपोर्टवर किंग खानची झाली चेकिंग, नेमकं कारण काय?

पॅनोरमा स्टुडिओज आणि मुगाफी निर्मित, दिग्पाल लांजेकर लिखित-दिग्दर्शित ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ हा भव्य चित्रपट ६ फेब्रुवारी रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचे निर्माते कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक (पॅनोरमा स्टुडिओज), विपुल अग्रवाल, जेनील परमार (मुगाफी) आणि मुरलीधर छतवानी आहेत. सहनिर्माते म्हणून रवींद्र औटी, तान्शा बत्रा आणि आलोक शर्मा यांचा सहभाग आहे.

Actress Fraud Case: प्रसिद्ध अभिनेत्रीवर ११.५ कोटींच्या फसवणुकीचा आरोप; मुंबई पोलिसांनी केला गुन्हा दाखल

या चित्रपटात मृणाल कुलकर्णी, अभिजीत श्वेतचंद्र,समीर धर्माधिकारी, अजय पूरकर, दिग्पाल लांजेकर, स्मिता शेवाळे, पुनीत इस्सार, विराजस कुलकर्णी यांच्यासह अनेक नामवंत कलाकारांच्या भूमिका आहेत. कलादिग्दर्शन प्रतीक रेडीज आणि संजय करोले यांचे असून छायांकन संदीप शिंदे यांनी केले आहे. संगीत अवधूत गांधी आणि मयूर राऊत यांचे असून पार्श्वसंगीत मयूर राऊत यांनी दिले आहे.

पॅनोरमा स्टुडिओजकडून ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ या चित्रपटाचे वर्ल्ड वाईड वितरण केले जाणार आहे. शिवरायांच्या अद्वितीय नेतृत्वाचा आणि स्वाभिमानाचा गौरव करणारा हा चित्रपट प्रेक्षकांसाठी एक अविस्मरणीय ऐतिहासिक अनुभव ठरणार आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.