महाराष्ट्राच्या जडणघडणीत मोलाचे योगदान देणारे लोकनेते, दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या स्मरणार्थ पिंपरी-चिंचवड नवीन प्रशासकीय इमारतीच्या आवारात भव्य स्मारक उभारण्यात यावे, अशी आग्रही मागणी भाजपा नेते तथा आमदार महेश लांडगे यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त श्रावण हर्डिकर यांना सविस्तर निवेदन दिले आहे. चिंचवड येथील डी-मार्टसमोरील 33.86 एकर जागेत उभारण्यात येत असलेल्या नवीन प्रशासकीय संकुलात सुमारे 8.65 एकर क्षेत्रावर मुख्य इमारतीचे काम सुरू असून, भविष्यात महापालिकेचे संपूर्ण प्रशासकीय कामकाज याच ठिकाणाहून चालणार आहे. या पार्श्वभूमीवर, या इमारतीच्या आवारातच दिवंगत अजितदादांचा पूर्णाकृती ब्राँझ पुतळा असलेले स्मारक उभारण्यात येणार आहे.
आमदार लांडगे यांनी नमूद केले आहे की, दिवंगत अजितदादा पवार यांनी उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री म्हणून महाराष्ट्राच्या सर्वांगीन विकासाला गती दिली. पायाभूत सुविधा, नागरी सेवा, प्रशासकीय निर्णयक्षमता आणि विकासाभिमुख धोरणांमुळे राज्याला वेगळी ओळख मिळाली. असे नेतृत्व अकाली काळाच्या पडद्याआड जाणे ही महाराष्ट्राची मोठी हानी असून, त्यांच्या कार्याची जपणूक होणे ही काळाची गरज आहे. त्यामुळे नवनिर्वाचित नगरसेवकांच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत अजितदादांच्या स्मारकाचा प्रस्ताव मंजूर करून पिंपरी-चिंचवडकरांच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात यावी, यासाठी आम्ही आग्रही आहोत. तत्पूर्वी जुन्या महापालिका सभागृहात अजितदादांचे तैलचित्र तातडीने बसवण्यात यावे, अशी सूचना प्रशासनाला केली आहे.
महाराष्ट्राच्या विकासाची ‘‘अजित सृष्टी’’
नवीन प्रशासकीय इमारतीतील सभागृहाला ‘अजितदादा पवार सभागृह’ असे नाव देण्यात यावे आणि शहराच्या स्थापनेपासून आजपर्यंतचा विकास प्रवास, तसेच भविष्यातील नियोजन अधोरेखित करणारी ‘पिंपरी-चिंचवड अजित सृष्टी’ उभारण्यात यावी, अशी संकल्पना आहे. शहराला विकासामध्ये एक नंबर बनवण्याचे स्वप्न अजितदादांनी पाहिले होते. ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करण्याचा संकल्प आम्ही केला आहे. हे स्मारक भावी पिढ्यांना लोकसेवेची प्रेरणा देणारे ठरेल आणि हिच अजितदादांना खरी श्रद्धांजली ठरेल, असा विश्वास यावेळी आमदार लांडगे यांनी व्यक्त केला आहे.
“महाराष्ट्राच्या विकासाच्या वाटचालीत प्रत्येक टप्प्यावर अजितदादा पवार यांचे दूरदृष्टीचे नेतृत्व लाभले. त्यांच्या कार्याची आणि विचारांची जपणूक होणे ही केवळ भावना नाही, तर आम्हा पिंपरी-चिंचवडकरांची जबाबदारी आहे. नवीन प्रशासकीय इमारतीच्या आवारात उभारण्यात येणारे स्मारक, सभागृहाला दिले जाणारे त्यांचे नाव आणि ‘अजित सृष्टी’ ही संकल्पना भविष्यातील पिढ्यांना लोकसेवेची प्रेरणा देईल. याबाबत महापालिका प्रशासन सकारात्मक निर्णय घेईल, असा मला पूर्ण विश्वास आहे. त्यासाठी आम्ही सर्वोतोपरी पाठपुरावा करणार आहोत, असं आमदार लांडगे यांनी म्हटलं आहे.