लातूर : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधये मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या निधनानंतर संपूर्ण महाराष्ट्रभर हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, अजित पवार यांच्या अकाली जाण्याने राष्ट्रवादीचे नेतृत्व कोण करणार? या संदर्भात अनेक चर्चा सुरु आहेत. यासंदर्भात उद्या राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना मुंबईत बोलवण्यात आले असल्याची माहिती सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिली आहे. सुनील तटकरे यांनी फोनद्वारे अनेक सूचना केल्या आहेत अशी माहितीही मंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिली आहे.
अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतृत्व कोण करणार? असा सवाल उपस्थित केला जात आहे. अशातच उद्या राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना मुंबईत बोलवण्यात आले असल्याची माहिती सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिली आहे. यामध्येच राष्ट्रवादीचे नेतृत्व राज्याचे नेतृत्व कोण करणार यावर शिक्कामोर्तब होईल असे बाबासाहेब पाटील म्हणाले. यासोबतच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात अशी आमची इच्छा आहे. पवारसाहेबांनी आजपर्यंत नेतृत्व केले आहे, दोन्ही पक्षात मोठे नेते आहेत बसून एकत्र निर्णय होईल अशी माहितीही बाबासाहेब पाटील यांनी दिली.
अजित पवारांच्या पश्चात आता दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाच्या चर्चांना वेग आलाय. पक्ष एकत्रीकरणाचा निर्णय पवार कुटुंब एकत्र बसून लवकरच घेईल अशी माहिती समोर येतेय. मात्र अंतिम निर्णय शरद पवारच घेतील असं समजतंय. पक्ष एकत्रित करण्याच्या आधीच्या चर्चांमध्ये पवार काका पुतण्यासह सुप्रिया सुळे, जयंत पाटील, अमोल कोल्हे, शशिकांत शिंदे सहभागी झाले होते. मात्र आता अजित पवार नसल्याने पवार कुटुंबीय एकत्र बसून हा निर्णय घेणार असल्याची माहिती समोर येत आहे.
उद्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते बारामतीला जाणार आहेत. सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा करणार आहेत. चर्चा झाल्यानंतर आमदारांच्या बैठकीत गटनेता निवड आणि सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करण्याबाबत प्रस्ताव ठेवण्यात येणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. यानंतर आमदारांचं संमती पत्र मुख्यमंत्र्यांना देण्यात येणार आहे. तसेच प्रस्ताव राज्यपालांना देखील देण्यात येणार आहे. राज्यपालांच्या समंतीनंतर उपमुख्यमंत्री पदाची शपथ सुनेत्रा पवार घेणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.