Manisha Mhaiskar : मोठी बातमी! कडक शिस्तीच्या मनीषा म्हैसकर गृह विभागाच्या नव्या अपर मुख्य सचिव, तर मिलींद म्हैसकर यांच्याकडे बांधकाम विभाग
esakal January 31, 2026 04:45 AM

Maharashtra Home Department : महाराष्ट्र शासनाने प्रशासकीय पातळीवर महत्त्वाचा बदल करत ज्येष्ठ आयएएस अधिकारी मनीषा म्हैसकर यांची अपर मुख्य सचिव (गृह) पदी नियुक्ती केली आहे. सध्याचे अपर मुख्य सचिव (गृह) इक्बालसिंग चहल हे शनिवारी सेवानिवृत्त होत असल्याने त्यांच्या जागी म्हैसकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

सामान्य प्रशासन विभागाने याबाबत अधिकृत आदेश जारी केला असून, गृह विभागातील अपर मुख्य सचिव पदाचा कार्यभार मनीषा म्हैसकर यांनी आज (३० जानेवारी) दुपारी स्वीकारण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सध्या त्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिव म्हणून कार्यरत होत्या. बांधकाम विभागाचा कार्यभार मिलींद म्हेसकर यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.

शासनाच्या आदेशानुसार, इक्बालसिंग चहल यांच्या सेवानिवृत्तीमुळे रिक्त होणाऱ्या पदावर मनीषा म्हैसकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यासोबतच, त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागातील कार्यभार संबंधित अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करून गृह विभागाचा पदभार स्वीकारावा, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

प्रशासनातील अनुभव, कडक शिस्त आणि निर्णयक्षमतेसाठी ओळखल्या जाणाऱ्या मनीषा म्हैसकर यांच्यावर आता राज्याच्या कायदा व सुव्यवस्था, अंतर्गत सुरक्षा आणि गृह प्रशासनाचीजबाबदारी असणार आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे गृह विभागाच्या कामकाजाला नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

NCP Ajit Pawar Sharad Pawar : दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? राजेश टोपेंनी दोन वाक्यात विषय संपवला, Video

दरम्यान, इक्बालसिंग चहल यांच्या कार्यकाळात गृह विभागात अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर मनीषा म्हैसकर यांच्याकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली असून, राज्य प्रशासनात हा बदल महत्त्वाचा मानला जात आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.