वेळापूर येथील सराईत
गुन्हेगार शेंडगे स्थानबद्ध
एमपीडीए कायद्यान्वये ‘येरवडा’त रवानगी
सकाळ वृत्तसेवा
वेळापूर, ता. ३० : सोलापूर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्याकडून सोलापूर ग्रामीण हद्दीतील शरीराविषयक तसेच वाळू तस्करी, अवैध धंदे करणाऱ्या सराईत गुन्हेगारांवर प्रभावी कारवाई करून गुन्हे दाखल करावेत, तसेच प्रभावी प्रतिबंधक कार्यवाही करण्याबाबत स्पष्ट आदेश देण्यात आले होते. यानुसार वेळापूर येथील सराईत गुन्हेगार अवधूत नारायण शेंडगे (रा. पिसेवाडी) याच्यावर एमपीडीए कायद्यानुसार कारवाई करण्यात आली असून, त्याला येरवडा कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे.
अवधूत शेंडगे याच्यावर आतापर्यंत शरीराविषयक गंभीर गुन्ह्यांसह खुनाचा प्रयत्न करणे, खंडणी मागणे, अवैध सावकारी करणे, घातक हत्यारांचा वापर करून दुखापत करणे, विनापरवाना हत्यार बाळगणे, हत्याराचा वापर करून जबर दुखापत पोचवणे असे ९ गुन्हे वेळापूर तसेच अकलूज पोलिस ठाणे येथे दाखल आहेत. त्याच्यावर यापूर्वीही प्रतिबंधक कारवाई करण्यात आलेली होती, तरी देखील पुन्हा पुन्हा गुन्हेगारी कृत्ये करून सर्वसामान्य लोकांमध्ये दहशत व भीती निर्माण करून सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण करण्याचे काम केले आहे.
अवधूत शेंडगे याच्या वाढत्या गुन्हेगारी वृत्तीवर आळा घालण्यासाठी पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्फत वेळापूर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक यांनी जिल्हा दंडाधिकारी कार्यालय, सोलापूर येथे एमपीडीए कायद्यान्वये कारवाईचा प्रस्ताव सादर केला होता. त्यानुसार जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी एमपीडीए कायद्यान्वये स्थानबद्ध करण्याबाबत आदेश निर्गमित केल्याने अवधूत शेंडगे यास येरवडा कारागृह येथे स्थानबद्ध करण्यात आले आहे.
---
चौकट
पोलिस अधीक्षकांचा यापुढेही कारवाईचा इशारा
सोलापूर ग्रामीण हद्दीतील वाळू तस्करी, शरीराविषयक व मालाविषयक गुन्हे, अवैध दारू विक्री करणाऱ्यांचे गुन्हेगारी अभिलेख तयार करण्यात आले असून, त्यांच्या विरुद्ध एमपीडीए कायद्यान्वये यापुढे देखील अशाच स्वरूपाची प्रभावी कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा ग्रामीण पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी दिला आहे.