रावेत, ता. ३० : रावेत, किवळे आणि मामुर्डी परिसरांत गेल्या काही आठवड्यांपासून कचरा उचलण्यात दिरंगाई होत आहे. यामुळे रस्त्याकडेला कचरा साचत आहे. रहिवासी सोसायट्यांच्या बाहेर पडलेले ढिगारे आणि मोकळ्या जागांमध्ये टाकलेला कचरा यामुळे दुर्गंधी पसरत आहे. दरम्यान, नागरिकांच्या या तक्रारींबाबत माहिती घेण्यास संपर्क साधला असता ‘ब’ प्रभाग क्षेत्रीय कार्यालयाचे आरोग्य निरीक्षक अमित पिसे यांनी प्रतिसाद दिला नाही.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, ‘‘काही ठिकाणी दोन तीन दिवस कचरा उचलला जात नसल्याने परिस्थिती अधिकच बिघडत आहे. सकाळी शाळेत जाणारी मुले, ज्येष्ठ नागरिक तसेच दुकानदार यांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.’’
या पार्श्वभूमीवर नागरिकांनी महापालिकेकडे वारंवार तक्रारी करूनही फारसा फरक पडत नसल्याचा आरोप केला आहे. नियमित कचरा संकलन, ओला सुका कचरा वेगळा घेण्याची काटेकोर अंमलबजावणी, सार्वजनिक ठिकाणी कचराकुंड्या बसवणे तसेच मोकळ्या जागांमध्ये कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
परिसरातील सामाजिक कार्यकर्त्यांनीही या समस्येकडे लक्ष वेधत सांगितले की, ‘‘कचरा व्यवस्थापन हा केवळ प्रशासनाचा नव्हे तर नागरिकांचाही प्रश्न आहे. योग्य वेळी कचरा देणे, रस्त्यावर कचरा न टाकणे आणि स्वच्छतेबाबत जनजागृती करणे आवश्यक आहे.’’
आमच्या सोसायटीबाहेर कचऱ्याचा मोठा ढीग साचतो. दोन दिवस तो साचून राहिला, की परिसरात दुर्गंधी पसरते. लहान मुलांना घराबाहेर सोडताना भीती वाटते.
- प्रकाश शिंदे, रहिवासी, रावेत
कचऱ्यामुळे रस्त्यावरून चालणे कठीण झाले आहे. उघड्यावर टाकलेला कचरा कुत्रे पसरवतात आणि सगळीकडे अस्वच्छता निर्माण होते. प्रशासनाने याबाबत तातडीने कार्यवाही करावी.
- सीमा जाधव, रहिवासी, किवळे
कचरा साचल्याने त्रास होतो.आरोग्याच्या विविध समस्या निर्माण होण्याचा धोका आहे. कचऱ्यामुळे मोकाट प्राण्यांची संख्याही आमच्या भागात वाढत आहे.
- राजेश पवार, मामुर्डी