कुंभारखाणी बुद्रुक येथे उद्या मॅरेथॉन स्पर्धा
सकाळ वृत्तसेवा
सावर्डे, ता. ३० ः विद्यार्थ्यांमध्ये शारीरिक तंदुरूस्ती, खेळभावना, शिस्त, आत्मविश्वास आणि आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने संगमेश्वर तालुक्यातील कुंभारखाणी बुद्रुक येथे ‘एक धाव शिक्षणासाठी’ या संकल्पनेतून भव्य शालेय मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रामोत्कर्ष संघ मुंबई, कुंभारखाणी ग्रामस्थ व क्रीडा मंडळ यांच्यावतीने आयोजित ही स्पर्धा येत्या रविवारी (ता. १ फेब्रुवारी) सकाळी ८.३० वा. कुंभारखाणी बुद्रुक येथील माध्यमिक विद्यालय येथे होईल.
ही स्पर्धा कुंभारखाणी बुद्रुक, मुरडव, आरवली, कुचांबे, राजिवली, येगाव, कुटरे, तळवडे, नांदगाव, आंबतखोल, असुर्डे व परिसरातील शालेय विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये ८ ते १६ वर्षे वयोगटातील मुलामुलींना सहभागी होता येईल. स्पर्धेसाठी एकूण चार गट निश्चित करण्यात आले असून, ८ ते १० वयोगटासाठी ५०० मीटर, १० ते १२ वयोगटासाठी १ किलोमीटर, १२ ते १४ वयोगटासाठी २ किलोमीटर आणि १४ ते १६ वयोगटासाठी ३ किलोमीटर असे धावण्याचे अंतर ठेवण्यात आले आहे. प्रत्येक गटातील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांना रोख रक्कम व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र आणि टी-शर्ट देण्यात येणार आहेत. या उपक्रमात परिसरातील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन संयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे.