‘राष्ट्रपतींना सलामी देणे
हा मोठा सन्मान’
साखरपा : दिल्लीच्या कर्तव्यपथावर परेड करत राष्ट्रपतींना सलामी देणे हा मोठा सन्मान असला तरीही त्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. आयुष्यातील कोणतेही यश हे कठोर मेहनतीशिवाय मिळत नाही, असे मत कॅडेट कॅप्टन अमिशा केदारी हिने व्यक्त केले. श्रीमान दत्तात्रय कबनूरकर इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ती बोलत होती. या प्रसंगी विद्यार्थ्यांनी केदारीची मुलाखत घेतली. श्वेता कनावजे, गौरीज बने आणि माही जाधव या तीन विद्यार्थ्यांनी अमिशा हिला प्रश्न विचारून तिचा एनसीसीचा प्रवास जाणून घेतला. केदारीची २०२३ला प्रजासत्ताक दिनी दिल्लीच्या कर्तव्यपथावर झालेल्या संचलनात निवड झाली होती. त्या वेळी तिने राष्ट्रपतींना सलामी दिली होती. या वेळी विद्यार्थ्यांनी कवायती सादर केल्या तसेच देशभक्तिपर गीतेही विद्यार्थ्यांनी सादर केली.
‘मॉनेटरी म्युझियम’ला
विद्यार्थ्यांची भेट
दापोली ः वराडकर–बेलोसे महाविद्यालयाच्या कला शाखेअंतर्गत अर्थशास्त्र विभागाने २१ जानेवारी रोजी प्रथम वर्ष कला, तृतीय वर्ष कला विषयाच्या विद्यार्थ्यांसाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, मुंबई येथे शैक्षणिक क्षेत्रीय अभ्यासभेट आयोजित केली होती. या भेटीत अर्थशास्त्र विभागातील प्रा. लक्ष्मण सीताफुले, डॉ. गणेश मांगडे, प्रा. जनार्दन गिरमकर यांच्या मार्गदर्शनाखाली एकूण ३९ विद्यार्थी सहभागी झाले होते. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया येथे पोहोचल्यानंतर बँकेच्या मार्गदर्शकांनी विद्यार्थ्यांना रिझर्व्ह बँकेचा इतिहास, स्थापना, उद्दिष्टे तसेच देशाच्या आर्थिक व्यवस्थेतील महत्त्वपूर्ण भूमिकेबाबत माहिती दिली. चलननिर्मिती, चलनविषयक धोरण, बँकिंग नियमन, महागाई नियंत्रण, आर्थिक स्थैर्य राखण्याची जबाबदारी, डिजिटल व्यवहारांची सुरक्षितता या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. यानंतर विद्यार्थ्यांनी बँकेच्या ‘मॉनेटरी म्युझियम’ला भेट दिली. येथे प्राचीन नाण्यांपासून आधुनिक चलनापर्यंतचा प्रवास, विविध कालखंडातील चलनपद्धती आणि भारतीय अर्थव्यवस्थेच्या विकासाचा इतिहास पाहण्याची संधी मिळाली.