छत्रपती संभाजीनगर - एका घटस्फोटित महिलेला लग्नाचे आमिष देऊन विवाहित पुरुषाने वारंवार शारीरिक संबंध ठेवले. यातून ती गर्भवती राहिल्यावर तिला गोळ्याही खायला दिल्या. लग्नाबाबत विचारणा केल्यावर धमक्या दिल्याने सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अजबसिंग मानसिंग बहुरे (वय ४३, रा. कमळापूर) याला पोलिसांनी अटक केली असून, त्याला न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
याप्रकरणी महिलेने पोलिसांततक्रार दिली. त्यानुसार या महिलेचा काही वर्षांपूर्वी घटस्फोट झालेला आहे. दरम्यान, तिची ओळख सेक्युरिटी कंपनीत कामाला असलेल्या बहुरे याच्याशी झाली. पुढे त्यांच्यात जवळीक वाढली. त्याने २०१९ पासून महिलेला लग्नाचे आमिष दाखवत तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले.
यातून ती गर्भवती राहिल्यावर त्याने गोळ्या खाऊ घालून गर्भपात केला. त्यानंतरही संबंध कायम असल्याने महिला पुन्हा गर्भवती झाली. आता ती अडीच महिन्यांची गर्भवती आहे. तिने बहुरे याला लग्नाबाबत विचारल्यावर त्याने टाळाटाळ केली. एवढेच नव्हे, तर प्रकार उघडकीस आणला तर तुला सोडून देईल व स्वतःचा जीव घेईल, अशा पद्धतीने ब्लॅकमेल केले.