बारामती - ‘नेहमीप्रमाणे कामाला गेलो होतो. तिथे सगळी लोकं मोबाईलमध्येच डोकं घालून बसलेली दिसली. काय झालेय रे, म्हणून पाहिले, तर अजितदादा गेल्याची बातमी दिसली. मटकन खालीच बसलो. काहीच सुचत नव्हते...कामावरून लवकर निघतो, असे मालकाला सांगितले.
घरी आलो, बायकोला सगळे सांगितले. खिशात दोन हजार रुपये घेतले आणि ‘दादाला अखेरचे बघून येतो’, असे म्हणत सायंकाळी घर सोडले,’ हे शब्द आहेत, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अंत्यविधीला लातूरहून आलेल्या ज्ञानोबा अवसरकर यांचे.
विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर जमलेल्या लाखो जनसमुदायातील ते एक प्रतिनिधी होते. तिथे उपस्थित प्रत्येकाची अजित पवार यांच्याशी जोडलेली वेगळीच कथा होती, वेगळीच भावना होती. ज्ञानोबा अवसरकर हे चाकूर तालुक्यातील आनंदवाडी गावचे रहिवासी. दररोज काम केले, तरच पोटाला घास, अशी त्यांची परिस्थिती.
नेहमीप्रमाणे ते त्या दिवशीही बिगारी कामासाठी गेले होते. मात्र, कामाच्या ठिकाणी असलेल्या लोकांच्या मोबाईलवरून अजित पवार यांच्याबद्दलची विमान अपघाताची बातमी समजली आणि क्षणात आयुष्य थांबल्यासारखे वाटले.
चार किलोमीटर अंतरावर असलेले घर गाठून त्यांनी बारामतीला जाण्याचा निर्णय घेतला. अवसरकर म्हणाले, ‘लातूरला आलो. तिकीट काढताना त्यांनाच विचारले, मला बारामतीला जायचेय, कसे जाऊ, त्यांनी दौंडपर्यंत जाण्याचा सल्ला दिला. रेल्वेने दौंड गाठले आणि तिथून सकाळी सात वाजता बारामतीला पोहोचलो.
बायको म्हणत होती, लोकं खूप जमतील, त्रास होईल, ती काळजीपोटी सांगत होती; पण येण्याचा निर्णय पक्का केला होता. माझा रोजगार बुडाला तरी चालेल, पण माझा आवडता नेता गेला, त्या ओढीने इथवर आलो,’ असे सांगताना ज्ञानोबा अवसरकरांचे डोळे पाणावले होते.
पवार कुटुंबाचा चाहता...
‘पवार कुटुंबाचा पहिल्यापासून चाहता आहे. अजितदादा आमच्या भागात महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी आले होते. तेव्हाच त्यांना अखेरचे पाहिले. प्रत्यक्ष भेट कधी झाली नाही, पण भाषणे ऐकली होती,’ असे सांगताना अवसरकरांना गहिवरून आले.
क्षणचित्र...
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करताना कार्यकर्त्यांसह नेत्यांनाही अश्रू अनावर
राज्यभरातील कार्यकर्ते उपस्थित
तरुण-तरुणी, महिला कार्यकर्त्या, पदाधिकाऱ्यांसह नेत्यांची हजेरी
राज्य व देशातील प्रमुख नेते बारामतीत
पुणे, पिंपरी-चिंचवड, बारामतीसह जिल्ह्यात ठिकठिकाणी उत्स्फूर्त बंद पुकारत दादांना अर्पण केली आदरांजली
अंत्यसंस्काराच्या ठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त, प्रशासनाकडून व्यवस्थित नियोजन