सोन्याचांदीचा आजचा भाव: गेल्या पंधरवड्यापासून विक्रमी तेजीचा झेंडा फडकावत असलेल्या सोने आणि चांदीच्या दरांना अवघ्या दोन दिवसांत जोरदार धक्का बसला आहे. दोन दिवसांतच सोन्याच्या दरात (Gold Price) तब्बल 20 हजार रुपयांची, तर चांदीच्या दरात (Silver Price) थेट 1 लाख रुपयांची घसरण झाल्याने बाजारात खळबळ उडाली असून, गुंतवणूकदारांचे धाबे दणाणले आहेत. काही दिवसांपूर्वी सोने पावणे दोन लाखांच्या आसपास, तर चांदी चार लाखांच्या ऐतिहासिक पातळीवर पोहोचली होती. मात्र, हीच तेजी आता तितक्याच वेगाने ओसरताना दिसत आहे.
जळगावच्या सराफ बाजारात गेल्या दोन दिवसांत सोन्याच्या दरात सुमारे 20 हजार रुपयांची घसरण झाली आहे. दोन दिवसांपूर्वी 1 लाख 80 हजार रुपयांवर पोहोचलेले सोने, आज 1 लाख 60 हजार रुपयांपर्यंत खाली आले आहे. त्याचप्रमाणे, चांदीच्या दरातही अभूतपूर्व घसरण नोंदवली गेली आहे. चार लाख रुपयांच्या आसपास गेलेली चांदी, अवघ्या दोन दिवसांत थेट तीन लाख रुपयांवर घसरली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात घसरण पहिल्यांदाच झाल्याने सुवर्ण व्यवसायिक आणि गुंतवणूकदार दोघेही संभ्रमात सापडले आहेत.
राष्ट्रीय पातळीवरही सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण नोंदवली गेली. नवी दिल्लीत आज 99.9 टक्के शुद्धतेच्या सोन्याचा भाव एका दिवसात 14 हजार रुपयांनी (7.65 टक्के) घसरून प्रति 10 ग्रॅम 1 लाख 69 हजार रुपयांवर आला आहे. गुरुवारी (दि. 29) सोन्याचा दर 12 हजार रुपयांनी वाढून 1 लाख 83 हजार रुपयांच्या विक्रमी उच्चांकावर पोहोचला होता. तसेच, चांदीच्याही दरात घसरण झाली असून, प्रति किलो चांदीचा भाव 20 हजार रुपयांनी म्हणजेच जवळपास 5 टक्क्यांनी कमी होऊन 3 लाख 84 हजार 500 रुपयांवर आला आहे. गुरुवारी चांदीचा दर 4 लाख 4 हजार 500 रुपयांच्या उच्चांकावर पोहोचला होता.
आंतरराष्ट्रीय बाजारातही मौल्यवान धातूंवर दबाव दिसून येत आहे. स्पॉट सोने 5.31 टक्क्यांनी (285.30 डॉलर) घसरून 5,087.73 डॉलर प्रति औंसवर व्यवहार करत होते. स्पॉट चांदी 12.09 टक्क्यांनी घसरून 101.47 डॉलर प्रति औंसवर आली. इंट्राडे व्यवहारात चांदी तब्बल 17.5 टक्क्यांपर्यंत घसरून 95.26 डॉलर प्रति औंसपर्यंत गेली होती. गुरुवारी आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याने 5,595.02 डॉलर, तर चांदीने 121.45 डॉलर प्रति औंसचा नवा विक्रम नोंदवला होता.
आणखी वाचा
RBI : रिझर्व्ह बँकेचा महाराष्ट्रातील अर्बन सहकारी बँकेला आर्थिक दंड, आरबीआयच्या कारवाईचं कारण समोर
आणखी वाचा