वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हेनेझुएलाचे कार्यकारी अध्यक्ष रॉड्रिगाझ यांच्याशी द्विपक्षीय संबंधांवर चर्चा केली आहे. शुक्रवारी संध्याकाळी ही चर्चा दोन्ही नेत्यांकडून दूरध्वनीवर करण्यात आली आहे. भारत व्हेनेझुएलाकडून काही प्रमाणात कच्च्या इंधन तेलाची खरेदी करतो. त्यासंबंधात ही चर्चा असावी असा कयास आहे. मात्र, अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. नुकताच अमेरिकेने व्हेनेझुएलावर हल्ला केला होता. त्या देशाचे अध्यक्ष मादुरो यांना अमेरिकेने व्हेनेझुएलातून अमेरिकेत नेले आहे. तेथे त्यांच्यावर न्यूयॉर्क येथील न्यायालयात अभियोग चालविला जात आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि व्हेनेझुएलाचे कार्यकारी अध्यक्ष रॉड्रिगाझ यांची चर्चा महत्वाची मानण्यात येत आहे.
भारत रशियाकडून कच्च्या इंधन तेलाची खरेदी करतो, असे कारण दाखवून अमेरिकेने भारतावर 50 टक्के व्यापार शुल्क लागू केले आहे. याचा परिणाम भारताच्या अमेरिकेला होणाऱ्या निर्यातीवर अजूनपर्यंत मोठ्या प्रमाणात दिसून आलेला नाही. मात्र, भविष्यात तो होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अमेरिकेशी व्यापारी संबंध अधिक मजबूत करण्यासाठी भारताने रशियाच्या तेलाची खरेदी बरीच कमी केली आहे. भारताने आता व्हेनेझुएलाकडून मोठ्या प्रमाणात तेल खरेदी करण्याची योजना सज्ज केली आहे, असे बोलले जाते. सध्या व्हेनेझुएलाच्या तेलक्षेत्रावर अमेरिकेचा ताबा असल्याची चर्चा आहे. अमेरिका भारताला व्हेनेझुएलातील तेल विकण्यास राजी आहे, अशीही चर्चा आहे. याच संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हेनेझुएलाचे कार्यकारी अध्यक्ष रॉड्रिगाझ यांच्याशी चर्चा केली असावी, असे अनुमान आहे. सध्याच्या परिस्थितीत हा चर्चेचा विषय आहे.