कट्टर विरोधक भाजप अन् काँग्रेस सत्तेसाठी मालेगावात एकत्र, विचारधारा बाजूला सारत नव्या गटाची स्थापना; नेमकं काय घडलं?
संदीप जेजुरकर January 31, 2026 01:13 PM

BJP Congress Alliance: मालेगाव महापालिकेच्या (Malegaon Municipal Corporation) राजकारणात अनपेक्षित आणि धक्कादायक वळण आले असून, एकमेकांवर सातत्याने टीका करणारे काँग्रेस (Congress) आणि भाजप (BJP) मालेगावमध्ये थेट एकत्र आले आहेत. महापौर व उपमहापौरपदाच्या निवडीपूर्वी सत्तास्थापनेसाठी हालचालींना वेग आला असतानाच, काँग्रेसचे तीन आणि भाजपचे दोन नगरसेवक एकत्र येत ‘भारत विकास आघाडी’ नावाचा पाच सदस्यांचा स्वतंत्र गट स्थापन करण्यात आला आहे. या नव्या आघाडीचे नेतृत्व काँग्रेसचे नगरसेवक एजाज बेग करणार असून, या घडामोडीमुळे मालेगाव महापालिकेतील सत्तासमीकरणे पूर्णपणे बदलली आहेत.

BJP Congress Alliance: ‘भारत विकास आघाडी’ची निर्मिती

मालेगाव महापालिकेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असला तरी, महापौर आणि उपमहापौरपदाची निवड अद्याप झालेली नाही. त्यामुळे सत्तास्थापनेसाठी सर्वच पक्षांकडून जोरदार हालचाली सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि भाजपने राजकीय मतभेद बाजूला ठेवत एकत्र येण्याचा निर्णय घेतला असून, ‘भारत विकास आघाडी’ची स्थापना करण्यात आली आहे. ही युती केवळ संख्याबळापुरती मर्यादित नसून, महापालिकेतील निर्णायक मतदानात महत्त्वाची ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Malegaon Election Result 2026: मालेगाव महापालिकेतील पक्षीय बलाबल 

एकूण नगरसेवक : 84 

इस्लाम पार्टी : 35

एम.आय.एम. (AIMIM) : 21

शिवसेना (एकनाथ शिंदे गट) : 18

समाजवादी पार्टी : 05

काँग्रेस : 03

भाजप : 02

या संख्याबळानुसार इस्लाम पार्टी सर्वात मोठा पक्ष ठरली आहे. मात्र, महापौर आणि उपमहापौरपदासाठी आवश्यक बहुमत मिळवण्यासाठी इतर पक्षांच्या पाठिंब्याशिवाय सत्ता स्थापन करणे कठीण आहे.

Malegaon Mayor Election: महापौरपदावर कोणाची मोहर?

महापौरपदासाठी सर्वसाधारण महिला आरक्षण जाहीर झाल्याने महापौर कोण होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. इस्लाम पार्टीचे प्रमुख आणि माजी आमदार आसिफ शेख हे महापौरपदाचा अंतिम निर्णय घेणार असल्याची चर्चा आहे. त्यांच्या बंधूच्या पत्नी नसरीन शेख यांना महापौरपदाची संधी मिळण्याची शक्यता जवळपास निश्चित मानली जात आहे. नियमानुसार, आरक्षण जाहीर झाल्यानंतर 8 ते 12 दिवसांच्या आत महापौर आणि उपमहापौराची निवड करणे बंधनकारक असून, त्यासाठी महापालिकेची विशेष सभा बोलावली जाणार आहे. या सभेचा अजेंडा तीन दिवस आधी सर्व नगरसेवकांना पाठवला जातो.

Islam Party Malegaon: इस्लाम पार्टीला मिळणार पाठिंबा?

काँग्रेस–भाजपच्या नव्या युतीमुळे इस्लाम पार्टीला अप्रत्यक्ष पाठिंबा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे उपमहापौरपदाच्या निवडीत कोण बाजी मारतो, याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. विशेष सभा कधी होते आणि त्या सभेत कोणते निर्णय घेतले जातात, याकडे संपूर्ण मालेगाव शहराचे लक्ष लागले आहे.

BJP Congress Alliance: राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण 

राजकारणात ‘कधी कोण कुणासोबत येईल याचा नेम नाही’, हे मालेगावच्या या घडामोडींनी पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे. काही दिवसांपूर्वी अकोटमध्ये भाजप आणि एमआयएम एकत्र आल्याची घटना राज्यभर चर्चेचा विषय ठरली होती. त्यावेळी तीव्र वाद झाल्यानंतर भाजपने माघार घेतली होती. मात्र, आता ज्या काँग्रेसवर भाजप नेहमीच टीका करते, त्याच काँग्रेससोबत मालेगावमध्ये भाजपने हातमिळवणी केल्याने राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले आहे.

आणखी वाचा 

Imtiaz Jaleel : एकनाथ शिंदेंनी मालेगाव महापालिकेत आमचा पाठींबा मागितला; इम्तियाज जलील यांचा खळबळजनक दावा

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.