उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अंतर्गत राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. तीन दिवसांपूर्वी बारामती विमानतळाजवळ अजित पवार यांचं चार्टर्ड विमान कोसळलं. यात अजित पवारांसह पाच जणांचा मृत्यू झाला. पवार कुटुंबिय, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजूनही या धक्क्यातून सावरला नसेल. कारण असं काही होईल याचा कोणी ध्यानी मनी सुद्धाविचार केला नव्हता. पण हे घडून गेल्यानंतर आता राजकारण पुन्हा केंद्रस्थानी आलं आहे. नवीन नेता, अनेकांची पणाला लागलेली राजकीय भविष्य या दृष्टीकोनातून आता राजकीय घडामोडींनी वेग पकडला आहे. आज सकाळीच शरद पवार यांची पत्रकार परिषद झाली. त्यात शरद पवार यांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्र येण्याबद्दल, सुनेत्रा पवारांचा शपथविधी या विषयी काही गौप्यस्फोट केले.
दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा झाली होती. याविषयीचा निर्णय 12 तारखेलाच जाहीर होणार होता असा खुलासा शरद पवार यांनी केला. त्याशिवाय सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्री पदाच्या शपथविधीविषयी आपल्याला काहीच कल्पना नसल्याचे शरद पवारयांनी सांगितलं. त्यानंतर आता वेगाने चक्र फिरली आहेत. सुनेत्रा पवार यांच्या शपथविधी विषयी आपल्याला काही माहित नाही असं शरद पवार बोलल्यानंतर दोन तासांच्या आत पार्थ पवार हे शरद पवार यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत. या भेटीमागचं कारण काय? दोघांमध्ये काय चर्चा होणार? हे अद्याप समजलेलं नाही. पण शरद पवारांच्या वक्तव्यानंतर दोन तासांच्या आता अजित पवारांच्या कुटुंबातील व्यक्ती शरद पवारांच्या भेटीसाठी पोहोचली आहे.
राजकीय घडामोडींनी वेग
आज दुपारी 2 वाजता राष्ट्रवादी काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक होणार आहे. त्यात काही निर्णय होतील. अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या उपमुख्यमंत्रीपदावर आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार यांची निवड होईल अशी चर्चा आहे. मुंबईत राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे. काल छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि धनंजय मुंडे या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती.