75 वर्षात आम्ही एकाला रात्रीत आमदार केलं, मोहिते पटालांचा राम सातपुतेंना टोला,  निवडणुकीनंतर बीडचे पार्सल बीडला पाठवू
सुनील दिवाण, एबीपी माझा February 01, 2026 12:13 AM

Dhairyasheel Mohite Patil : जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांच्या प्रचार सभांना खऱ्या अर्थाने आज पासून सुरुवात झाली आहे. सोलापुरात देखील राजकीय वातावरण चांगलच तापल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. मोहिते पाटील विरुद्ध जयकुमार गोरे असा संघर्ष याही वेळेला समोर येऊ लागला आहे. दरम्यान, आज खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजपचे माजी आमदार राम सातपुते यांचा चांगलाच समाचार घेतल्याचं पाहायला मिळालं. 75 वर्षात आम्ही एकाला एका रात्रीत आमदार केलं, असा टोला मोहिते पाटील यांना राम सातपुते यांना लगावला. 

आम्ही कधीही कुठली जबाबदारी झटकून पळून गेलो नाही

दोन्ही राष्ट्रवादीच्या प्रचार शुभारंभात वेळापूर येथे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी येत्या सात तारखेला विरोधकांचा सुपडा साफ करण्याचे आवाहन केले होते. यासोबत पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी मोहिते पाटलांनी संस्था बंद पाडल्या अशा पद्धतीचे जे आरोप केले होते त्यालाही आज खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी चोख उत्तर दिले . आम्ही 75 वर्षापासून अनेक संस्था काढल्या काही तात्कालीन परिस्थितीमुळे अडचणीत आल्या पण आम्ही त्या पुन्हा सुस्थितीत आणल्या. आम्ही कधीही कुठली जबाबदारी झटकून पळून गेलो नाही, उलट प्रत्येक गोष्टीला धीराने सामोरे गेलो अशा शब्दात उत्तर दिले. माझी आमदार राम सातपुते यांच्यावर टीका करताना यांनी एक संस्था काढून दाखवावी आणि ती चालवून दाखवावी असे आवाहन देखील केले होते. 

निवडणुकीनंतर बीडचे पार्सल बीडला परत पाठवून देऊ 

या निवडणुकीत माळशिरस तालुक्यातील नऊ जिल्हा परिषद आणि 18 पंचायत समिती जागांवर विजय मिळवायचा आणि विरोधकांचा सुफडा साफ करायचा असे आवाहन खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी आपल्या भाषणात केले होते. आम्ही 75 वर्षात काय केले विचारणाऱ्याला एवढेच सांगतो की आम्ही एकाला एका रात्रीत आमदार केले असा टोलाही यावेळी भाजपचे माजी आमदार राम सातपुते यांना लगावला. या निवडणुकीनंतर बीडचे पार्सल बीडला परत पाठवून देऊ असे सांगत सातपुते यांच्यावर सडकून टीका केली. 

एकेकाळचे पश्चिम महाराष्ट्राचे नेते आता अकलूज नगरपालिके पुरते मर्यादित, जयकुमार गोरेंची टीका

धैर्यशील मोहिते पाटील यांच्या टीकेला उत्तर देताना जयकुमार गोरे म्हणाले की,  एकेकाळचे पश्चिम महाराष्ट्राचे नेते आता अकलूज नगरपालिके पुरते मर्यादित झाले आहेत. यावरुन कोणाचा सुपडा साफ झाला हे महाराष्ट्राने पाहिले आहे. नगरपालिकेत हे फक्त अकलूज मध्येच दिसले तर सोलापूर महापालिकेत यांच्यात तुतारीला भोपळाही फोडता आला नाही असा टोला पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी लगावला. त्यामुळे सुफडा साफ कोणाचा झाला याचे आत्मपरीक्षण करावी असा सल्ला गोरे यांनी खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांना दिला. 

 

 

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.