व्यवसाय आणि गुंतवणुकीसाठी देशात सर्वात पोषक वातावरण कुठे आहे? याचे उत्तर आता समोर आले आहे. भारत सरकारच्या ताज्या इकनॉमिक सर्व्हेमध्ये आलेल्या 'ईज ऑफ ड्युइंग बिझनेस' क्रमवारीत उत्तर प्रदेशने मोठी झेप घेत देशात अव्वल स्थान पटकावले आहे. विशेष म्हणजे त्रिपुरा आणि ओडिशालोबत उत्तर प्रदेश संयुक्तपणे पहिल्या क्रमांकावर आहे. एकीकडे उत्तर प्रदेशने बाजी मारली असताना, पश्चिम बंगालची स्थिती मात्र सर्वात वाईट असून ते शेवटच्या क्रमांकावर फेकले गेले आहेत.
उत्तर प्रदेश सरकारने घेतलेले धाडसी निर्णय आणि प्रशासकीय सुधारणांमुळे हे शक्य झाले आहे. सरकारी कामातील अडथळे दूर करणे आणि नियमांचे ओझे कमी करणे यावर योगी सरकारने भर दिला होता. पहिल्या टप्प्यात २३ महत्त्वाच्या सुधारणा यशस्वीपणे लागू केल्यानंतर आता सरकार दुसऱ्या टप्प्यासाठी सज्ज झाले आहे. या अंतर्गत जमीन वाटप, बांधकाम परवानगी, कामगार कायदे आणि पर्यावरण मंजुरी यांसारख्या ३० नवीन क्षेत्रांत सुधारणा केल्या जाणार आहेत.
या यशानंतर सरकारी अधिकारी कमालीचे उत्साही आहेत. मुख्य सचिवांनी या सुधारणांसाठी एका आठवड्यात कृती आराखडा तयार करण्याचे आदेश दिले आहेत. पुढील दोन महिन्यांत सर्व नवीन नियम लागू करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यामुळे उत्तर प्रदेशात छोटे-मोठे उद्योग सुरू करणे आता पूर्वीपेक्षा खूपच सोपे आणि सुलभ होणार आहे.
या यादीत इतर राज्यांची स्थिती पाहिली तर महाराष्ट्र ११ व्या क्रमांकावर आहे. बिहार आणि केरळ १४ व्या, तर राजधानी दिल्ली १८ व्या क्रमांकावर आहे. गुजरात आणि राजस्थानसारख्या राज्यांना मागे टाकत उत्तर प्रदेशने मिळवलेले हे यश गुंतवणुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. यामुळे येणाऱ्या काळात उत्तर प्रदेशात मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.