Gondia News : टाकेझरीच्या जंगलातून माओवाद्यांचा शस्त्रसाठा हस्तगत; मोठ्या कारवाया उघडकीस येण्याची शक्यता
esakal February 01, 2026 01:45 AM

गोंदिया - महाराष्ट्र-मध्य प्रदेश-छत्तीसगड (एमएमसी) झोनमधील बेस कॅम्प मुरकुडोह भागातील टाकेझरी बेवारटोला जंगल परिसरात माओवाद्यांनी लपवून ठेवलेला मोठा शस्त्रसाठा हस्तगत करण्यात गोंदिया पोलिस दलाला यश आले आहे. आत्मसमर्पित माओवाद्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी विशेष मोहीम राबवून हा साठा हस्तगत केला.

माओवाद्यांनी हिंसेचा मार्ग सोडून समाजाच्या मुख्य प्रवाहात यावे, या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने २००५ पासून राबविलेल्या आत्मसमर्पण योजनेला मोठे यश मिळाले आहे. या योजनेअंतर्गत गोंदिया जिल्ह्यात तब्बल १४ माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे.

माओवाद्यांच्या एमएमसी झोनचा प्रवक्ता व एसझेडसीएम पदावर असलेला अनंत ऊर्फ विकास नवज्योत नागपुरे याने २८ नोव्हेंबर २०२५ रोजी त्याच्या दहा साथीदारांसह तसेच दरेकसा एरिया कमिटीचा कमांडर रोशन वेडजा याने १३ डिसेंबर २०२५ रोजी दोन साथीदारांसह आत्मसमर्पण केले होते. जीआरबी डिव्हिजनअंतर्गत दरेकसा एरिया कमिटीतील तब्बल १४ माओवाद्यांनी गोंदिया जिल्हा पोलिस दलासमोर शरणागती पत्करली होती.

आत्मसमर्पित माओवाद्यांच्या चौकशीतून मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे २५ जानेवारी रोजी गोंदिया पोलिस दलाने मुरकुटडोह बेस कॅम्प अंतर्गत टाकेझरी-बेवारटोला डॅम परिसरातील जंगलात विशेष शोध मोहीम राबविली. या मोहिमेदरम्यान माओवाद्यांनी भूमिगत करून ठेवलेला शस्त्रसाठा व स्फोटकांचा साठा हस्तगत करण्यात आला.

दरम्यान, गोंदिया जिल्ह्यात आत्मसमर्पित माओवाद्यांची सखोल चौकशी सुरू असून, त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे विविध जंगल परिसरात सतत शोध मोहिमा राबविण्यात येत आहेत.

असा आहे शस्त्रसाठा

एक एके-४७ रायफल, दोन एसएलआर रायफल, एक कोल्ट ऑटोमोटिव्ह पिस्टल, एक १२ बोअर रायफल, एक क्लेमोर माईन, तीन एके-४७ मॅग्झीन, नऊ एसएलआर मॅग्झीन, एक इंसास मॅग्झीन, १८७ एसएलआर राउंड , ५८ एके ४७ राउंड, १५ इंसास राउंड, ३५ रायफल राउंड, १२ आठ एमएम राउंड, कोल्ट ऑटोमोटिव्ह पिस्टल ४५ राउंड १४, बीजीएल चार, सुरका शेल्स दहा, सुरका लाँचर राउंड दहा, स्फोटक पदार्थ अंदाजे ८.५ किलो, डिटोनेटर, कॉर्डेक्स वायर, वॉकीटॉकी, सोलर प्लेट, बॅटऱ्या, कलर प्रिंटर.

कारवाई करणारे पथक

ही कारवाई गडचिरोली परिक्षेत्राचे पोलिस उपमहानिरिक्षक अंकित गोयल, गोंदियाचे पोलिस अधीक्षक गोरख भामर यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक प्रमोद भातनाते, सहायक पोलिस निरीक्षक संजय नाईक, पोलिस उपनिरीक्षक श्रीकांत हत्तीमारे, पोलिस हवालदार लक्ष्मण घरत, मुस्ताक सय्यद, पोलिस शिपाई रमेश उईके, राजेश तावडे, नक्षल सेल गोंदिया तसेच सी-६० पथकाने केली.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.