माजी क्रिकेटपटू आणि पंजाब काँग्रेसचे माजी प्रदेश अध्यक्ष नवजोत सिंह सिद्धू यांची पत्नी डॉ. नवजोत कौर सिद्धू यांनी काँग्रेसला रामराम करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी एक्सवर एक पोस्ट लिहीत आपण त्या काँग्रेसला अलविदा म्हटले आहे जी मेहनती आणि लायक नेत्यांचे ऐकले जात नाही आणि निर्णय खाजगी स्वार्थाआधारे घेतले जातात. नवजोत कौर यांनी काँग्रेसला सोडण्यामागे पंजाब प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अमरिंदर सिंह राजा वडिंग यांच्यावर खापर फोडले आहे. राजा वडिंग यांनी काँग्रेसला बर्बाद केल्याने आपण काँग्रेस सोडत आहोत असे डॉ. नवजोत कौर सिद्धू यांनी म्हटले आहे. मात्र, काँग्रेसने आधीच नवजोत कौर यांची पदावरुन गच्छंती केली आहे.
पंजाब काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष म्हणून राजा वडिंग असल्याची टीकाही डॉ. नवजोत कौर सिद्धू यांनी केली आहे. त्यांनी मुख्यमंत्र्यांशी संधान साधून काँग्रेसला बर्बाद करत स्वत:ला जेल जाण्यापासून वाचवले आहे. त्यांनी आम आदमी पार्टीशी संगनमत करुन किरकोळ लाभासाठी पार्टीला विकले आहे. माझ्यासाठी तुमच्याकडे निलंबन पत्र तयार होते, परंतू त्या सुमारे १२ ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांचे काय ? जे नवजोतला नुकसान पोहचवण्यासाठी मजीठिया सोबत काम करत होते? तुम्ही नवजोत सिद्धूला हरवण्यासाठी त्या सर्वांना मोठ-मोठ्या पदांवर बसवले.
माझ्याकडे त्यांचा बुरखा फाडण्यासाठी योग्य पुरावे आहे. परंतू त्यात मला रस नाही, कारण मी स्वत: काँग्रेस सोडली आहे. कारण काँग्रेसमध्ये कोणी आशादायक नेतृत्व नाही. मला हरवण्यासाठी अनेक लोकांना मुद्दामहून उभे केले होते. आशुजी, चन्नीजी, भट्टलजी, डॉ. गांधीजी आणि अन्य ज्येष्ठ नेत्यांच्या विरोधात तुमची कारवाई कुठे आहे.ज्यांनी खुलेआम तुम्हाला आणि पार्टीला आव्हान दिले आहे. तुम्ही हास्यास्पद ठरले आहात आणि लोक तुमची रिल्स बनवून मजा घेत आहेत. नवजोत यांच्या प्रेम करणाऱ्या काँग्रेस नेत्यांचा अपमान करणे बंद करा, तुम्ही पक्षाला जिंकवण्याच्या ऐवजी त्यास बर्बाद करण्यात बिझी आहात.तुमच्या मातृपक्षाच्या प्रती इमानदार न रहाण्याबद्दल तुम्हाला लाज वाटली पाहिजे असेही डॉ. नवजोत कौर सिद्धू यांनी म्हटले आहे.
५०० कोटींच्या आरोपाबद्दल पक्षाने काढले
डिसेंबरमध्ये काँग्रेसने नवज्योत कौर सिद्धू यांना पक्षातून निलंबित केले होते. नवज्योत कौर यांनी मुख्यमंत्रीपदासाठी ५०० कोटी रुपयांची बोली लागते असे वादग्रस्त विधान केले होते. त्यानंतर काँग्रेसने त्यांचे प्राथमिक सदस्यत्वही रद्द केले. काँग्रेसमध्ये जो कोणी ५०० कोटी रुपयांची सुटकेस देतो तो मुख्यमंत्री होतो असे त्या म्हणाल्या होत्या. त्यामुळे वाद झाल्यानंतर नवज्योत कौर यांनी आपले विधान तोडूनमोडून सादर केल्याचा दावा केला होता.
सिद्धू दाम्पत्य भाजपमध्ये जाणार का?
डॉ. नवज्योत कौर सिद्धू यांनी काँग्रेस सोडल्यानंतर, आता त्यांचे पती नवज्योत सिंग सिद्धू हे देखील पक्ष सोडणार का ? असा सवाल केला जात आहेत. मात्र, सिद्धू यांनी अद्याप यावर भाष्य केलेले नाही. बराच काळ काँग्रेस पक्षाचे सदस्य असूनही त्यांनी पक्षापासून अंतर राखले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पंजाब दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नवज्योत कौर यांनी आज त्यांच्या अकाऊंटवर तीन पोस्ट पोस्ट केल्या. या पोस्टमध्ये त्यांनी पंतप्रधान मोदींचे कौतुक केले आणि त्यांच्या भेटीला विरोध करणाऱ्यांना राजकीय चोर म्हटले आहे.