अक्कलकोट येथील वटवृक्ष मंदिरात सोमवारी गुरुप्रतिपदा उत्सव. सायंकाळी शहरातून पारंपारीक पालखी सोहळा
esakal February 01, 2026 04:45 AM

AKK26B05821
अक्कलकोट : येथील श्री स्वामी समर्थ मंदिरातील प्रसन्न गाभारा.
---
श्री वटवृक्ष स्वामी मंदिरात उद्या गुरुप्रतिपदा उत्सव
सायंकाळी शहरातून पारंपरिक पालखी सोहळ्यासह विविध धार्मिक कार्यक्रम
सकाळ वृत्तसेवा
अक्कलकोट, ता. ३१ : येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या वतीने सोमवारी (ता. २) माघ वद्य प्रतिपदा (गुरुप्रतिपदा) उत्सव मोठ्या भक्तिभावात साजरा करण्यात येणार आहे.
गुरुप्रतिपदेच्या दिवशी पहाटे ५ वाजता ‘श्रीं’ची काकड आरती होईल. त्यानंतर पुरोहितांच्या हस्ते श्री गुरुपूजन सोहळा होणार आहे. सकाळी ८ ते ९ या वेळेत देवस्थान समितीच्या वतीने जोतिबा मंडपात पुरोहितांच्या वैदिक मंत्रोच्चारात लघुरुद्र अभिषेक होईल. स्वामीभक्तांना सामूहिक बॅच पद्धतीने अभिषेकात सहभागी होता येणार असून, त्यासाठी अभिषेक पावतीची व्यवस्था करण्यात आली आहे.
दुपारी ११.३० वाजता ‘श्रीं’ची महानैवेद्य आरती होईल. त्यानंतर दुपारी १२ ते ३ या वेळेत मैंदर्गी- गाणगापूर रोडवरील देवस्थानच्या भक्तनिवास येथे सर्व स्वामीभक्तांसाठी भोजन महाप्रसादाची सोय करण्यात आली आहे. सायंकाळी ५ ते रात्री ९.३० या वेळेत शहरातून भजन, दिंड्या व सवाद्य पालखी सोहळा होईल. हा पालखी सोहळा वटवृक्ष मंदिरातून फत्तेसिंह चौक, मेन रोड, कारंजा चौक, समाधी मठ मार्गे बुधवार पेठ, कारंजा चौक, मौलाली गल्ली, सुभाष गल्ली, गुरुमंदिर, भारत गल्ली व स्वामी गल्ली असा परतीचा मार्ग घेत रात्री साडेनऊ वाजता वटवृक्ष मंदिरात पोचेल. पालखी मंदिरात आल्यानंतर उपस्थित भाविकांना शिरा प्रसाद वाटप करून गुरुप्रतिपदा उत्सवाची सांगता होईल.
सर्व धार्मिक कार्यक्रम देवस्थानचे चेअरमन नगरसेवक महेश इंगळे व प्रथमेश इंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरोहित मोहनराव पुजारी, मंदारमहाराज पुजारी व व्यंकटेश पुजारी यांच्या हस्ते पार पडणार आहेत. भाविकांचे दर्शन सुलभ व्हावे यासाठी देवस्थान समितीच्या वतीने आवश्यक व्यवस्था करण्यात आली असून, सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलिस बंदोबस्ताचीही मागणी करण्यात आली आहे.
गुरुप्रतिपदा उत्सवानिमित्त सर्व भाविकांनी ‘श्रीं’चे दर्शन, पालखी सोहळा, सेवा व भोजन महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन देवस्थान विश्वस्त समितीचे चेअरमन महेश इंगळे व सचिव आत्माराम घाटगे यांनी केले आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.