वक्तृत्व स्पर्धेत तनया पांचाळ प्रथम
esakal February 01, 2026 04:45 AM

21044

वक्तृत्व स्पर्धेत तनया पांचाळ प्रथम

खारेपाटणची स्पर्धा; राज्यभरातील स्पर्धकांचा उत्स्फूर्त सहभाग

सकाळ वृत्तसेवा
तळेरे, ता. ३१ : मुंबई विद्यापीठ अंतर्गत येणारे कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, खारेपाटण यांच्यावतीने संस्थापक स्वातंत्र्य सैनिक गुरुवर्य वीर शंकरराव पेंढारकर यांच्या १०२ व्या जयंतीनिमित्त महाविद्यालयात आयोजित राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत ‘एसएसपीएम’ इंजिनिअरिंग कॉलेज, कणकवलीची विद्यार्थिनी तनया पांचाळ हिने प्रथम क्रमांक प्राप्त केला. या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.
या स्पर्धेला राज्यभरातील युवा वक्त्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. स्पर्धेचे उद्घाटन खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रवीण लोकरे यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून खारेपाटण हायस्कूलचे माजी विद्यार्थी श्रीकृष्ण पाटणकर, त्यांच्या पत्नी सौ. पाटणकर यांच्यासह महाविद्यालयाचे प्राचार्य, संस्था संचालक डॉ. ए. डी. कांबळे, संस्थेचे सचिव महेश कोळसुळकर, सहसचिव राजेंद्र वरुणकर, खजिनदार संदेश धुमाळे, सर्व संचालक, खारेपाटण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे मुख्याध्यापक संजय सानप, पर्यवेक्षक संतोष राऊत हे उपस्थित होते.
श्री. पाटणकर यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात परिस्थितीशी जुळवून घेणारा, विचारशील व जबाबदार युवा वक्ता घडणे ही काळाची गरज असून तो राष्ट्रविकासासाठी उपयुक्त ठरेल, असे प्रतिपादन केले. या स्पर्धेत एकूण २२ स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. स्पर्धेचा निकाल असा ः प्रथम तनया पांचाळ (कणकवली), द्वितीय सानिया यादव (वंझारे कॉलेज, लांजा), तृतीय अथर्व पाध्ये, उत्तेजनार्थ माधवी शेंगाळे, हर्षाली कानडे (खारेपाटण महाविद्यालय). या स्पर्धेसाठी ‘भारतीय न्याय व्यवस्थेची विश्वासार्हता’, ‘मीडिया : सत्याचा आवाज की सनसनाटीचा बाजार’, ‘विकास व पर्यावरण-आरे ते तपोवन’, ‘भारतीय लोकशाही एकाधिकारशाहीच्या दिशेने का?’,‘भारतीय शिक्षणव्यवस्था आणि बेरोजगारी’ विषयांवर सखोल विचारमंथन झाले. परीक्षक म्हणून प्रा. वैभव खानोलकर, प्रा. तानाजी गोधडे यांनी काम पाहिले. सर्व विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कम व चषक देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. प्रा. तानाजी गोधडे, प्रा. माधवी पांचाळ यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. गजानन व्हंकळी यांनी आभार मानले.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.