पाळीव प्राण्यांसाठी स्वतंत्र उद्यान
esakal February 01, 2026 04:45 AM

पाळीव प्राण्यांसाठी स्वतंत्र उद्यान
मिरा-भाईंदर शहरातील उड्डाणपुलाखाली उभारणी
भाईंदर, ता. ३१ (बातमीदार) : मिरा-भाईंदर शहरात मेट्रोखाली तीन ठिकाणी उड्डाणपूल बांधण्यात आले आहेत. या पुलांखाली महापालिकेकडून चार उद्यानांची उभारणी केली जात असून, त्यात विशेष करून पाळीव प्राण्यांसाठी स्वतंत्र उद्यान तयार केले जाणार आहे.
भाईंदर ते काशी मिरा मुख्य रस्त्यावर कोंडी दूर करण्यासाठी मेट्रो मार्गाच्या खाली नागपूरच्या धर्तीवर तीन ठिकाणी एमएमआरडीएकडून उड्डाणपूल उभारण्यात आले आहेत. यापैकी प्लेझेंट पार्क ते सिल्वर पार्क, साईबाबानगर ते शिवार गार्डन दोन उड्डाणपूल वापरासाठी खुले केले आहेत. त्यांचे हस्तांतरण एमएमआरडीएकडून पालिका प्रशासनाकडे करण्यात आले आहे. या दोन उड्डाणपुलांखाली अतिक्रमण होऊ नये, यासाठी पालिका आयुक्त राधाबिनोद शर्मा यांनी चार उद्याने तयार करण्याचा निर्णय घेतला. त्यातील तीन उद्यानांपैकी एक लहान मुलांसाठी, एक वरिष्ठ नागरिकांसाठी आहे, तर चौथे उद्यान पाळीव प्राण्यांसाठी राखीव असणार आहे. राज्य सरकारच्या महाराष्ट्र नगरोत्थान योजने अंतर्गत १५ कोटींचा निधी मंजूर आहे. उद्यानातील पायवाटा, हिरवळ विकास, प्रकाश व्यवस्था, स्वच्छता व्यवस्था तसेच खुल्या व्यायामशाळेतील असणार आहे.
---------------------------------
मेट्रो उड्डाणपुलाखालील मोकळ्या जागेचा नागरिकांच्या हितासाठी उपयोग करून घेण्यासाठी उद्यान, खुली व्यायामशाळा उभारण्याचे काम सुरू आहे. शहारातील पाळीव प्राण्यांसाठी उद्यानाद्वारे स्वतंत्र व्यवस्था आहे. यामुळे नागरिकांना विरंगुळासोबत आरोग्यविषयक सुविधा उपलब्ध होणार आहेत.
- राधाबिनोद शर्मा, आयुक्त

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.