आंदुर्ले येथे आज
पखवाज वादन
मार्गदर्शन कार्यशाळा
कुडाळ, ता. ३१ ः श्री जगन्नाथ संगीत विद्यालय, पखवाज अलंकार महेश सावंत आणि विद्यार्थी परिवारातर्फे भूषण देसाई यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ पखवाज वादन मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन केले आहे. ही कार्यशाळा उद्या (ता. १) महेश सावंत यांच्या आंदुर्ले येथील निवासस्थानी होणार असून या कार्यशाळेत नामवंत पखवाजाचार्य व संगीत साधक सहभागी होणार आहेत.
या कार्यशाळेसाठी मृदंग महामेरू अशोक पांचाळ (देवाची आळंदी) हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत. शास्त्रीय पखवाज वादनातील तांत्रिक बाजू, तालशुद्धता, वादनाची बैठक, बोलांची रचना तसेच भजन व अभंग वादनातील पखवाजाचे महत्त्व यावर सखोल मार्गदर्शन करण्यात येणार आहे. सकाळच्या सत्राची सुरुवात सकाळी साडेसातला होणार असून उद्घाटन सोहळ्यानंतर सकाळी आठला शास्त्रीय मार्गदर्शन व प्रात्यक्षिके, भजनातील वादन शैली तसेच अभंगवारी पद्धतीने पखवाज वादन यावर सविस्तर प्रशिक्षण देण्यात येणार आहे. सायंकाळी सहाला भजन गायक भजन सम्राट रविदास पवार (आळंदीकर) यांच्या सुमधुर आवाजात भजन-गायनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. त्यांना मृदंगाचार्य मंगेश कदम, आकाश पारखे, तुकाराम जानगुडे आणि सोपान कुरकुटे यांची पखवाज साथ लाभणार आहे. या कार्यशाळेला समस्त संगीत रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन श्री जगन्नाथ संगीत विद्यालय तसेच सर्व विद्यार्थीवर्गातर्फे केले आहे.