21042
सुविधा नाहीत; मतही नाही!
पिंगुळीवासीयांचा इशारा; मतदानावर बहिष्काराचा फलक
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ३१ ः पिंगुळी (ता.कुडाळ) येथील म्हापसेकर तिठा येथे झळकलेला ‘मतदान बहिष्कार’ असा फलक सध्या संपूर्ण परिसरातच नव्हे, तर राजकीय वर्तुळातही चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांची रणधुमाळी सुरू असतानाच नागरिकांच्या संतापाचा असा उघड इशारा मिळाल्याने प्रशासन आणि राजकीय नेतेमंडळींची चांगलीच कोंडी झाल्याचे बोलले जात आहे.
पिंगुळी-म्हापसेकर तिठा येथील सार्वजनिक शौचालयाची दीर्घकाळापासून झालेली दुरवस्था, दुर्गंधी व आरोग्याच्या गंभीर समस्या याकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे. या पार्श्वभूमीवर अज्ञात व्यक्तींनी सार्वजनिक शौचालयावर थेट जनतेच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांना येथे मत मागण्याचा अधिकार नाही, असा स्पष्ट संदेश देणारा फलक लावला आहे. या फलकावर, हा प्रश्न सुटेपर्यंत कोणत्याही उमेदवारांनी अथवा नेत्यांनी मतदान मागण्यासाठी येथे येऊ नये, असे स्पष्ट आवाहन करण्यात आले असून, हा थेट मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशाराच मानला जात आहे. निवडणुकांच्या तोंडावर आश्वासनांची बरसात होते. मात्र, निवडणुका संपल्यानंतर मूलभूत सुविधांकडे पाठ फिरवली जाते. सार्वजनिक आरोग्यासारख्या अत्यावश्यक विषयावरही प्रशासन व लोकप्रतिनिधी उदासीन असल्याचा संताप या फलकातून व्यक्त झाला आहे. या घटनेमुळे पिंगुळी परिसरात जोरदार चर्चा सुरू असून, प्रशासन तातडीने दखल घेणार की नेहमीप्रमाणे ‘निवडणूक संपेपर्यंत शांतता’, हा फॉर्म्युला राबवणार? असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.
----
पॉईंटर
फलकामुळे राजकीय वर्तुळात खळबळ
- जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उघड इशारा
- सार्वजनिक शौचालयाची दीर्घकाळची दुरवस्था व दुर्गंधीचे कारण
- शौचालयामुळे आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण झाल्याचा आरोप
- प्रश्न सुटेपर्यंत उमेदवारांना मत मागण्यास मनाई असा ठाम संदेश
- ‘जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांना मत नाही’ असा थेट इशारा
- निवडणुकीआधी आश्वासनांची बरसात, नंतर मात्र दुर्लक्षाचा आरोप
- मूलभूत सुविधांकडे प्रशासन व लोकप्रतिनिधींचे उदासीन धोरण
- प्रशासन दखल घेणार, की ‘निवडणूक संपेपर्यंत शांतता’ धोरण राबवणार?