पार्थ पवारांना शपथविधी सोहळ्यापासून दूर का ठेवलं? सर्वात मोठी बातमी समोर
Tv9 Marathi February 01, 2026 01:45 AM

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, आज सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे, राजभवनामध्ये उपमुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं, त्यांना राज्यपालांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ दिली आहे, सुनेत्रा पवार यांना महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. दरम्यान त्यापूर्वी राष्ट्रवादीने आपल्या सर्व आमदारांची मुंबईमध्ये महत्त्वाची बैठक बोलावली होती, या बैठकीमध्ये एकमतानं सुनेत्रा पवार यांची गटनेतेपदी निवड करण्यात आली, त्यानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राष्ट्रवादीने बोलावलेल्या आमदारांच्या या बैठकीमध्ये दोन प्रस्ताव मांडण्यात आले होते, त्यातील एक प्रस्ताव म्हणजे सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड तर दुसरा प्रस्ताव हा सुनेत्रा पवार यांना पक्षाशी संबंधित सर्व निर्णय घेण्याचे संविधानिक अधिकार मिळण्याशी संदर्भात होता. हे दोन्ही प्रस्ताव या बैठकीत एकमतानं मंजुर करण्यात आले.

दरम्यान शपथविधी सोहळ्यात पार्थ पवार कुठेच दिसले नाहीत, त्यामुळे चर्चेला उधाण आलं आहे.  सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अशी माहिती समोर येत आहे की, पार्थ पवार यांना पवार कुटुंबीयांनी बारामतीत थांबवून ठेवले होते,  काही कौटुंबिक आणि पुढील विधींसंदर्भात शरद पवार यांनी त्यांना थांबायला सांगितले होते, त्यानुसार ते बारामतीत थांबले होते, अशी माहिती यासंदर्भात सूत्रांकडून समोर येत आहे.

दरम्यान सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच त्यांना इतर तीन खात्यांची देखील जबाबदारी देण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. सुनेत्रा पवार यांना . क्रीडा आणि युवक कल्याण, राज्य उत्पादन शुल्क आणि अल्पसंख्यांक खातं देण्यात आलं आहे. मात्र त्यांना अर्थ खातं देण्यात आलेलं नाहीये. समोर आलेल्या माहितीनुसार अर्थखातं आपल्याकडेच ठेवण्यासाठी भाजप आग्रही आहे, तर दुसरीकडे राष्ट्रवादीमधून देखील या खात्याची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे आता भविष्यात या खात्यासंदर्भात काय निर्णय होणार हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. सध्या हे खातं मुख्यमंत्र्यांकडेच राहणार असल्याची माहिती समोर येत आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.