नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण उद्या 2026-27 साठीचा अर्थसंकल्प सादर करतील. यंदा रविवारी अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. निर्मला सीतारमण नरेंद्र मोदी सरकारच्या कार्यकाळात सलग नवव्यांदा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. सीतारमण यांची ही विक्रमी कामगिरी असेल.
केंद्रीय अर्थमंत्री म्हणून निर्मला सीतारमण 1 फेब्रुवारीला नवव्यांदा अर्थसंकल्प मांडतील. यावेळी भारत आणि अमेरिका यांच्यातील लांबलेला व्यापारी करार, अमेरिकेनं भारतावर लादलेलं टॅरिफ, आंतरराष्ट्रीय पातळीवरील वाढलेली अस्थिरता या परिस्थितीत निर्मला सीतारमण अर्थसंकल्प मांडणार आहेत. या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून विकसित भारताच्या दिशेनं वाटचाल करण्यासंदर्भात मोठे निर्णय घेतले जाऊ शकतात.
निर्मला सीतारमण नरेंद्र मोदींच्या कार्यकाळात नवव्यांदा अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम त्यांच्या नावावर करतील. 2019 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुसऱ्यांदा सरकार स्थापन केलं तेव्हा निर्मला सीतारमण यांना अर्थमंत्रिपद देण्यात आलं. यानंतर 2024 मध्ये देखील एनडीएचं सरकार आल्यानंतर निर्मला सीतारमण यांच्याकडेच अर्थमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. पूर्ण अर्थसंकल्प आणि अंतरिम बजेट असे एकूण 8 अर्थसंकल्प निर्मला सीतारमण यांनी मांडले आहेत.
माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी नऊ वेळा अर्थसंकल्प सादर केले आहेत. चिदंबरम यांनी हे अर्थसंकल्प विविध पंतप्रधानांच्या कार्यकाळात सादर केले आहेत. प्रणव मुखर्जी यांनी देखील विविध पंतप्रधानांच्या कार्यकाळात 8 वेळा अर्थसंकल्प मांडले आहेत.
निर्मला सीतारमण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात नवव्यांदा अर्थसंकल्प मांडणार आहेत. एकाच पंतप्रधानांच्या कार्यकाळात त्या सलग नऊ वेळा अर्थसंकल्प सादर करतील.
सर्वाधिक अर्थसकंल्प सादर करण्याचा विक्रम मोरारजी देसाई यांच्या नावावर आहे. मोरारजी देसाई यांनी 10 वेळा भारताचा अर्थसंकल्प सादर केला आहे. मोरारजी देसई यांनी 1959 ते 1964 या कालावधीत सहा अर्थसंकल्प सादर केले. मोरारजी देसाई यांनी 1967 ते 1969 मध्ये चार वेळा अर्थसंकल्प सादर केले. पंतप्रधान जवाहरलाल नेहरु आणि पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या कार्यकाळात अर्थमंत्री असताना मोरारजी देसाई यांनी 10 वेळा अर्थसंकल्प सादर केला. निर्मला सीतारमण मोरारजी देसाई यांचा विक्रमाच्या दिशेनं आणखी एक पाऊल टाकतील.