संजय शिरसाट यांचे राज्यातील राजकीय घडामोडींवर मोठे विधान, म्हणाले, माणसा पेक्षा, फक्त…
Tv9 Marathi January 31, 2026 10:46 PM

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने मोठी खळबळ उडाली. अजित पवार मुंबईहून बारामतीकडे निघाले असताना त्यांच्या विमानाचा मोठा अपघात झाला. अजित पवार आज आपल्यात नाहीत यावर विश्वासही कोणाला बसत नाहीये. अजित पवार यांच्या निधनानंतर आज त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. मात्र, यादरम्यान पवार कुटुंबातील वाद पुढे आला. सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेत असून याबाबत आपल्याला कोणतीही कल्पना नाही किंवा सुनेत्रा पवार यांच्यासोबत चर्चा झाली नसल्याचे शरद पवार यांनी स्पष्ट केले. सुनेत्रा पवार या रात्री उशिरा मुंबईमध्ये मुलगा पार्थ पवार याच्यासोबत देवगिरी बंगल्यावर आल्या. आता पुन्हा मुंबईहून पार्थ पवार बारामतीकडे आजोब शरद पवार यांना भेटण्यासाठी दाखल झाला. गोविंदबागेत शरद पवार यांची भेट घेण्यासाठी पार्थ पवार गेला.

अजित पवार यांना जाऊन काही तासच झाले असता अशा घडामोडी घडत असल्याने चर्चांना उधाण आलंय. या घडामोडींवर बोलताना संजय शिरसाट यांनी मोठे विधान केले. संजय शिरसाट यांनी म्हटले की, अजित दादा गेल्यावर एवढी मोठी घडामोड होईल असे वाटले नव्हते. काल राख सावडली आणि सुनेत्रा पवार मुबंईला गेल्या आहेत.

आज त्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेत आहेत. राजकिय घडामोडी पाहता माणसापेक्षा खुर्ची महत्वाची आहे, असा राज्यातील राजकारणावर त्यांनी टोला मारला. पुढे शिरसाट यांनी म्हटले की, शासकीय दुखवटा संपण्या आधी सर्व होत आहे. अजित पवार हे राष्ट्रवादीचे सर्व्हे सर्वा होते. आता परिस्थिती बदलली आहे, सामूहिक निर्णयाचे वारे वाहत आहे आणि त्यामुळे शरद पवार खंड पडेल असेल म्हणाले असतील.

संजय शिरसाट यांनी सध्याच्या घडामोडींवर हे विधान केले. अजित पवार यांच्या निधनानंतर संपूर्ण पवार कुटुंब एकत्र दिसले. मात्र, शरद पवार यांना कोणताही निरोप न देता आणि त्यांची भेट न घेता सुनेत्रा पवार या मुंबईला आल्या आणि त्यामध्येच त्या आज उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेत आहेत.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.