Nashik Akkalkot Greenfield Highway : 31 डिसेंबर रोजी मंजुरी मिळालेल्या नाशिक–अक्कलकोट ग्रीनफिल्ड महामार्गाच्या (Nashik-Akkalkot Greenfield Highway) कामाला गती मिळाली असून प्रकल्प सध्या प्रगतीपथावर आहे. 29 जानेवारी रोजी लोकसभेत झालेल्या बैठकीत या महामार्गाबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. यावेळी महामार्गासाठी आवश्यक असलेल्या सुमारे 90 टक्के जमिनींसाठी अधिसूचना जाहीर करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
हा महत्वाकांक्षी प्रकल्प ‘पंतप्रधान गती शक्ती राष्ट्रीय मास्टर प्लॅन’ अंतर्गत मंजूर करण्यात आला आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी लोकसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना या महामार्गाच्या सद्यस्थितीबाबत माहिती दिली.
नाशिक–अक्कलकोट महामार्ग हा केवळ नाशिक आणि सोलापूरपुरताच मर्यादित न राहता पुढे आंध्र प्रदेशपर्यंत विस्तारला जाणार आहे. तसेच या महामार्गाला वाढवण बंदराजवळ दिल्ली–मुंबई द्रुतगती मार्गाशी जोडण्याचा प्रस्ताव आहे. यासोबतच नाशिकजवळील समृद्धी महामार्गालाही हा मार्ग जोडण्यात येणार असल्यामुळे उत्तर, पश्चिम आणि दक्षिण भारतातील दळणवळण अधिक सुलभ होणार आहे.
हा सहा पदरी ग्रीनफिल्ड महामार्ग महाराष्ट्रातील नाशिक, अहिल्यानगर, बीड, धाराशिव आणि सोलापूर या जिल्ह्यांतून जाणार आहे. नाशिक, सोलापूर आणि अक्कलकोट यांना थेट जोडणारा हा महामार्ग एकूण 374 किमी लांबीचा असणार असून, त्यासाठी सुमारे 19,142 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. हा महामार्ग पूर्ण झाल्यानंतर उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्रातील अंतर लक्षणीयरीत्या कमी होणार असून प्रवास अधिक वेगवान होईल.
हा महामार्ग एकदा कार्यान्वित झाल्यानंतर सुरत ते चेन्नई दरम्यान मालवाहतूक आणि प्रवासी वाहतुकीचा वेळ सुमारे 14 तासांनी कमी होईल, असा अंदाज आहे. यामुळे जवळपास 201 किलोमीटर अंतराची बचत होणार आहे. राज्यांतर्गत प्रवासाच्या दृष्टीने पाहता, नाशिक ते अक्कलकोट प्रवासाचा वेळ सुमारे चार तासांनी कमी होणार असून, सुमारे 51 किलोमीटर अंतराची बचत होईल.
दरम्यान, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले की, या प्रकल्पाच्या अंमलबजावणीदरम्यान मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होणार आहे. नाशिक–अक्कलकोट ग्रीनफिल्ड कॉरिडॉरचे काम तीन वर्षांच्या कालावधीत पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. हा महामार्ग NHAIच्या सुरत–चेन्नई महामार्गाचा भाग असल्यामुळे, केवळ महाराष्ट्रच नव्हे तर गुजरात, राजस्थान आणि आंध्र प्रदेश यांसारख्या राज्यांनाही या मार्गाचा लाभ होणार आहे. तसेच नाशिकच्या आडगाव येथून हा महामार्ग मुंबई–आग्रा महामार्गालाही जोडला जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
आणखी वाचा