Nagpur Crime: 'तुमची वर्दी उतरवून टाकू, पोलिस आमचं काहीच करू शकत नाही'; राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांची लकडगंज पोलिसांना मारहाण!
esakal February 01, 2026 08:45 PM

नागपूर: ‘तुम्ही आम्हाला सांगणारे कोण? पोलिस आमचं काहीच करू शकत नाही,’ अशा शब्दात गस्तीवर असलेल्या लकडगंज पोलिसांच्या पथकाशी वाद घालत त्यांना धक्काबुक्की करून मारहाण केल्याची घटना शुक्रवारी रात्रीच्या सुमारास गंगाबाई घाट रोड परिसरात उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी महिलेसह तिघांविरोधात गुन्हा दाखल करीत दोन युवकांना ताब्यात घेतले.

Rohit Pawar: रोहित पवार उचलणार शैक्षणिक जबाबदारी! सुरक्षारक्षक विदीप जाधव यांच्या घरी मुलांशी साधला संवाद; पवार कुटुंबीय पाठीशी

अनिकेत ऊर्फ गोलू दुर्गाप्रसाद सहारे (वय २५), शुभम ऊर्फ बल्लू दुर्गाप्रसाद सहारे (वय ३०), ममता दुर्गाप्रसाद सहारे (वय ५५, सर्व रा.स्विपर कॉलनी गंगाबाई घाट, जुनी मंगळवारी) अशी आरोपींची नावे आहेत. यामधील अनिकेत आणि शुभम या दोघांना पोलिसांनी अटक केली. मिळालेल्या माहितीनुसार, गंगाबाई घाट रोड परिसरात शुक्रवारी रात्री पोलिस कर्मचारी गस्तीवर असताना काही युवक सार्वजनिक रस्त्यावर विनाकारण थांबून सिगारेट ओढत असल्याचे आढळले.

‘इथून निघा, रस्त्यावर अडथळा निर्माण करू नका,’असे पोलिसांनी सांगताच अनिकेत ऊर्फ गोलू सहारे आणि शुभम ऊर्फ बल्लू सहारे यांनी संताप व्यक्त केला. ‘आम्ही इथेच उभे राहणार, तुला काय करायचं ते कर,’ असे म्हणत त्यांनी पोलिसांशी वाद घालण्यास सुरुवात केली. याच दरम्यान त्यांची आई ममता सहारे घटनास्थळी आली. ‘तुमची वर्दी उतरवून टाकीन,’ तसेच ‘खोट्या गुन्ह्यात अडकवून नोकरी घालवीन,’ अशा धमक्या त्यांनी दिल्या.

यावेळी तिघांनी त्यांच्या अंगावर धावून जात, पोलिसांना धक्काबुक्की व शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तसेच थापडाही मारल्या. त्यामुळे आजूबाजूचे नागरिक जमा झाले. ही माहिती पथकाने ठाण्यात दिली असता, घटनास्थळी ताफा दाखल झाला. दरम्यान ते एका राजकीय पक्षाच्या नेत्याचे कार्यकर्ते असल्याची माहिती समोर आली.

Satara News: दोन्ही राष्ट्रवादी प्रचारात सक्रिय; विलीनीकरणाचा निर्णय पवार कुटुंबीयांनी घ्यावा, सातारा जिल्ह्यातील नेत्यांच्या भावना!

पोलिसांनी तातडीने कारवाई करत अनिकेत आणि बल्लू सहारे यांना ताब्यात घेतले. घटनेनंतर परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. मात्र, पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. या प्रकरणी विविध कलमान्वये पोलिस निरीक्षक अरुण क्षीरसागर यांनी आरोपींवर गुन्हा दाखल करीत, तपास सुरू केला आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.