Marathi Book : शब्दांतून उलगडणारी चंद्रकळेची भर्जरी गाथा...
esakal February 01, 2026 08:45 PM
प्रवीण टोकेकर

अन्न, वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजांचं कलेत रूपांतर करणाऱ्या मानवाच्या उत्क्रांतीला दाद द्यायला हवी. यातील प्रत्येक गरजेचा कलाविष्कार माणसाच्या प्रतिभेची साक्ष पटवतो. यात पाककौशल्याने आगळी चूल मांडली आहे, तर वास्तुरचनेने नवा कळस गाठला आहे. वस्त्रांची तर दुनियाच झगमगते आहे. वल्कले आणि प्राणिमात्रांची कातडी गुंडाळून थंडीवाऱ्यापासून स्वत:चं संरक्षण करणारा माणूस ‘स्मार्ट फॅब्रिक’पर्यंत येऊन ठेपला. त्रिमित छपाईचे वेगवेगळे उन्मेष दाखवू लागला. कुठल्याही अभ्यासकाला हा प्रवास स्तिमित करणारा आहे असं वाटल्याशिवाय राहणार नाही.

वस्त्रप्रावरणांचा हा पट इतका व्यापक आहे की, त्याचा थांग लागू नये. अशा अफाट वस्त्रविश्वात पश्चिम घाटावरल्या संस्कृतीचा एक ठिपका. पश्चिम दख्खनच्या पठारावर प्राचीन काळापासून वस्त्रांची भाषा, ठेवण, रंग आणि पोत कशी बदलत, उत्क्रांत होत गेली, याचा थक्क करणारा लेखाजोखा सांगणारा ग्रंथ म्हणून विनय नारकर यांच्या ‘वस्त्रगाथा’कडे बोट दाखवावं लागेल. मराठी साहित्यप्रेमींना ‘वस्त्रगाथा’ ही गर्भरेशमी भेटच ठरावी.

शरीरालाच वस्त्र मानून आपल्याकडे जन्मजन्मांतरीची रूपकं मांडली गेली आहेत. पुराणकथा सांगितल्या गेल्या आहेत, पण वस्त्रविभ्रम हा काही सामान्य मराठी माणसाचा स्वभावविशेष नव्हे. फैनाबाज कापडं ही गरीबाची मिरासही नव्हती आणि गरजही नव्हती, ते विभ्रम धनवंतांचे, पण वस्त्रकलेचे हे आविष्कार घडवणारे पिढ्यान् पिढ्यांचे विणकर, कारागीर यांनी केवढं मोठं संचित निर्माण करून ठेवलंय याची जाणीव या ग्रंथातून होते.

दख्खनच्या पठाराच्या पश्चिम भागात अशीच एक देखणी वस्त्रसंस्कृती आकाराला आली. दक्षिणेच्या जनजीवनाशी तादात्म्य पावलेल्या या वस्त्रांच्या नाना परीच्या प्रतिमा, श्लोक, अभंग, ओव्या आणि कथाकाव्यातून उमटल्या. कुठे चित्रचौकटीत विसावल्या किंवा शिल्प होऊन बसल्या. कुसुमाग्रजांनी तर नकुलाशी मुकाबला करणाऱ्या नागाचं वर्णन ‘प्रमदेचे मादक वस्त्र जणू सळसळते’ असं केलं आहे. कविवर्य वसंत बापटांची सकीना ‘सैल लेहेंगा बिलगे अंगा, फुलवेलाची वर नक्षी’ लेऊन रसिकांच्या भेटीला येते. संतसाहित्य आत्मगत करणारे मराठीचे वाल्मिकी ग. दि. माडगुळकरांना ‘मुकी अंगडी बालपणाची, रंगीत वसने तारुण्याची, जीर्ण शाल मग उरे शेवटी, लेणे वार्धक्याचे’ असं संत कबिराच्या भाववृत्तीने म्हणावंसं वाटतं.

Sambhajinagar Book Festival : मराठी संस्कृतीत ग्रंथ-ग्रंथकारांची थोर परंपरा

‘का रे भुललासी वरलीया रंगा’ हे खरंच. हा रंग खरवडला की रोकडं जगणं दिसायला लागतं, पण वरलीया अंगावरची वस्त्रप्रावरणंही बरंच काही बोलतात. सांगतात. क्वचित सुनावतातही. सांस्कृतिकदृष्ट्या प्रगल्भ होत गेलेल्या समाजाचं हे लक्षण आहे. वस्त्रांना बोलतं करणारी ही भाषा वेगळीच. ती अनेकदा थेट भाष्य करते. दख्खनी माणसांच्या वस्त्रालंकारात, वेषभूषेत कालौघात जे बदल घडले, ते वेगळीच कहाणी सांगतात. वेगळं भाष्य करतात. ही अलिखित भाष्ये वस्त्रगाथेचे लेखक विनय नारकर यांनी विचक्षक वृत्तीनं हुडकली आहेत. एखाद्या हुन्नरी कलाकाराच्या बाजाने ‘वस्त्रगाथा’ अक्षरश: विणली आहे.

हल्ली ‘गूगल’कृपेने ज्ञानाचं भांडार खुलं झालं आहे. एखादा संदर्भ हवा असेल तर ‘गुगलून’ काढलं की त्या मंथनातून अनेक रत्नं बाहेर पडतात. पण सखोल बुडी मारण्याचं ते ठिकाण नव्हे. ‘वस्त्रगाथा’ हा ग्रंथ माहिती, दृष्टिकोन, आशय आणि मांडणी या सर्वच बाबतीत ‘गूगल’च्या पलीकडचा आहे.

वस्त्रगाथेचं वाचन फक्त वस्त्रप्रेमींनीच करावं असं नव्हे, या गाथेचा धागा पकडून वाचकाला अनेक मुलखात हिंडून येता येईल. अभिजात मराठी भाषेला विणकरांनी, वस्त्र-कारागिरांनी आणि विशेषत: गावगाड्यातल्या गृहिणींनी किती समृद्ध केलंय याचं प्रत्यंतर येईल. उदाहरणार्थ, काठ, पदरपेशा, ताणेबाणे असे किती तरी शब्द दिले. किती तरी म्हणी जन्मल्या. हा ग्रंथ वाचताना जाणवतं की, लेखकाने नुसती माहितीच जमवलेली नाही, तर आपल्या मांडणीतून नकळतपणे एक दृष्टीच वाचकांना देऊ केली आहे.

सटीक वस्त्रज्ञान, त्याच अभिरूचीची रसिकता, ते सांगण्याची असोशी आणि हे सगळं दिमाखात पेश करणारी ग्रंथनिर्मिती. माधुरी पुरंदरे आणि डॉ. सदानंद बोरसे यांचं उत्तम संपादन या ग्रंथाला लाभलं आहे. सर्वार्थानं जागतिक दर्जाची अशी ही ग्रंथनिर्मिती झाली आहे. ‘काळी चंद्रकळा, जैसे रात्रीचे गगन, घेणाराचे मन मोठे, दादारायाचे’ ही ओवीच जणू मुखपृष्ठावर सोनेरी चंद्रकोरीच्या रूपाने अवतरली आहे. ग्रंथरूप आणि मुखपृष्ठासाठी विकास गायतोंडे यांना विशेष दाद द्यायला हवी. ग्रंथनिर्मितीची काही परीक्षा असती, तर तीत ‘वस्त्रगाथा’ने पैकीच्या पैकी गुण वसूल केले असते. हा ग्रंथ पदरी असावा, पैठणीसारखा जतन करावा. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे द्यावा, असं त्याचं रंगरूप आहे. मराठी ज्ञानभाषा व्हायला हवी असेल, तर वस्त्रगाथेच्या दर्जाची पुस्तके मराठीत निर्माण व्हायला हवीत.

पुस्तकाचे नाव : वस्त्रगाथा
  • लेखकाचे नाव : विनय नारकर

  • संपादन : माधुरी पुरंदरे,

  • डॉ. सदानंद बोरसे

  • प्रकाशक : राजहंस प्रकाशन, पुणे

  • पृष्ठे : २८२ मूल्य : ९०० रु.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.