टी-20 वर्ल्ड कप : 'भारताविरुद्ध सामना खेळणार नाही', पाकिस्तानची घोषणा; नेमकं काय घडतंय?
BBC Marathi February 02, 2026 05:45 AM
Getty Images

पाकिस्तान क्रिकेट टीम टी-20 वर्ल्ड कपमधील 15 फेब्रुवारी रोजी भारताविरुद्ध होणाऱ्या सामन्यावर बहिष्कार टाकणार आहे, असं पाकिस्ताननं जाहीर केलं आहे.

भारत आणि श्रीलंकेत 7 फेब्रुवारीपासून आयसीसी टी-20 वर्ल्ड कप सुरू होत आहे.

पाकिस्तान सरकारने एक्सवर पोस्ट करत म्हटलं, "इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान सरकारने पाकिस्तान क्रिकेट टीमला आयसीसी टी-20 वर्ल्ड कप 2026 मध्ये सहभागी होण्यास परवानगी दिली आहे. मात्र, पाकिस्तान क्रिकेट टीम 15 फेब्रुवारी 2026 रोजी भारताविरुद्धच्या सामन्यासाठी मैदानात उतरणार नाही."

पाकिस्तान सरकारचे हे निवेदन अशा वेळी आले आहे, जेव्हा भारताविरुद्ध सामना खेळू न देण्याचा विचार पाकिस्तान करत असल्याच्या बातम्या समोर येत होत्या.

गेल्या आठवड्यात पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनी पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर सांगितले होते, "पंतप्रधानांनी सर्व पर्यायांचा विचार करून हा प्रश्न सोडवण्याचे निर्देश दिले आहेत."

पाकिस्तानने बांगलादेशला दिला होता पाठिंबा

सुरक्षा कारणांमुळे बांगलादेशने भारतात टी-20 वर्ल्ड कपचे सामने खेळण्यास नकार दिला होता. त्यानंतर त्यांच्या जागी स्पर्धेत स्कॉटलंडला सहभागी करण्यात आले.

यानंतर पीसीबी अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनी आयसीसीचा निर्णय चूक आणि दुटप्पीपणा असल्याचा आरोप केला होता.

X/MOHSIN NAQVI मोहसीन नक्वी यांनीही शाहबाज शरीफ यांची भेट घेतली

ते म्हणाले होते, "बांगलादेशवरही तेच नियम लागू झाले पाहिजेत, जे इतर कोणत्याही देशावर होतात. जर एखादा देश सुरक्षा कारणांमुळे दुसऱ्या देशात खेळण्यास नकार देतो, तर बांगलादेशलाही तो अधिकार असायला हवा."

"या परिस्थितीत सरकार वर्ल्ड कपसाठी श्रीलंकेत टीम पाठवण्याचा निर्णय घेईल. जर बांगलादेशला न्याय मिळाला नाही, तर आयसीसीने हवे असल्यास 22 व्या टीमला सहभागी करून घेऊ शकते."

मोहसिन नक्वी यांना विचारण्यात आले, "जर पाकिस्तान टी-20 वर्ल्ड कप खेळत नसेल, तर प्लॅन बी काय आहे?" यावर त्यांनी उत्तर दिले होते, "आधी निर्णय होऊ द्या. आमच्याकडे प्लॅन ए, बी, सी आणि डी आहेत."

'अंतिम सामना भारत-पाकिस्तानमध्ये झाला तर?'

या घोषणेनंतर सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. क्रिकेट समालोचक हर्षा भोगले यांनी या निर्णयावर एक्सवर पोस्ट केली.

ते म्हणाले, "जर पाकिस्तान वर्ल्ड कपमध्ये सहभागी झाला, पण भारताविरुद्ध सामना खेळला नाही, तर आयसीसीची प्रतिक्रिया पाहणे रंजक ठरेल. याची कायदेशीर स्थिती काय आहे हे मला माहिती नाही. मागील उदाहरणांवरून हा विषय कसा निकाली निघेल, हेही सांगता येत नाही. पण ब्रॉडकास्टर्सचे नुकसान भरून काढण्यासाठी आयसीसी पाकिस्तानच्या उप्तन्नातून रक्कम वसूल करू शकते. असे झाले तरी मला आश्चर्य वाटणार नाही. जर अतिम सामना भारत-पाकिस्तानमध्ये झाला तर काय होईल?"

दरम्यान, ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटले, "मोठी बातमी: पाकिस्तानने सांगितले आहे की, ते टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारताविरुद्ध सामना खेळणार नाही. माझ्या मते यासाठी आयसीसीने पाकिस्तानविरोधात कारवाई केली पाहिजे. बांगलादेशकडे नाराज होण्याची काही कारणे होती, पण पाकिस्तानने आधीच हायब्रिड मॉडेलला संमती दिली होती. आता मागे हटण्याचे कारण नाही."

टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात आतापर्यंत 8 वेळा सामना झाला आहे. त्यापैकी एका सामन्यात पाकिस्तानला विजय मिळाला असून उर्वरित 7 सामन्यांत भारताने विजय मिळवला आहे.

वनडे वर्ल्ड कपमध्येही दोन्ही संघांमध्ये 8 वेळा सामना झाला आहे. या सर्व आठही सामन्यांत पाकिस्तानला पराभवाचा सामना करावा लागला आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

  • पीसीबीचा बांगलादेशला पाठिंबा, पाकिस्तान टी-20 वर्ल्ड कप खेळणार की नाही, याबाबत काय म्हटलं?
  • टी-20 विश्वचषकाला मुकावं लागल्यास बांगलादेशला किती कोटींचे नुकसान होणार?
  • बांगलादेशच्या टी-20 वर्ल्ड कपमधून माघारीमुळे नेमका कुणाला फटका बसणार?
© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.