श्रमजीवी संघटनेचा हक्कांसाठी एल्गार
जिल्ह्यात ‘पालखी’च्या माध्यमातून सभासद नोंदणी
पालघर, ता. १ (बातमीदार)ः पालघर, ठाणे जिल्ह्यात श्रमजीवी संघटनेच्या सभासद नोंदणी मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला आहे. यानिमित्ताने श्रमजीवी संघटनेची पायी दिंडी गावोगावी, पाड्यापाड्यात मार्गक्रमण करत असून, मोहिमेला उदंड प्रतिसाद मिळत आहे.
पालघर जिल्ह्यातील विक्रमगड, जव्हार, डहाणू, मोखाडा, वाडा आणि तलासरी, पालघर आणि ठाणे जिल्ह्यातील शहापूर, ठाणे, भिवंडी, अंबरनाथ, कल्याण, मुरबाड या तालुक्यातील भागांत ते कातकरी वाड्यांवर मुक्काम करत आहे. आदिवासी कुटुंबांसोबत राहून त्यांच्या समस्या प्रत्यक्ष जाणून घेत आहेत. या भेटींमध्ये ‘संविधानातून मूलभूत हक्कांचा जागर’ करत आदिवासी समाजाला हक्कांची जाणीव करून देत आहेत. जव्हार तालुक्यातील केळघर येथील कातकरी वाडीत विवेक पंडित भेट दिली. या वेळी श्रमजीवी संघटनेची ही मोहीम केवळ सभासद नोंदणीपुरती मर्यादित नसून, आदिम कातकरी आणि गरिबांच्या, वंचिताच्या मूलभूत अधिकार, संविधानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी व्यापक लोकचळवळ असल्याचे सांगितले. या दिंडीचे नेतृत्व संघटनेचे अध्यक्ष रामभाऊ वारणा, सरचिटणीस बाळाराम भोईर, विजय जाधव, संघटक सचिव रूपेश डोळे, पूजा सुरूम, सीता घाटाळ यांच्यासह जिल्हाध्यक्ष सुरेश रेंजड (पालघर), अशोक सापटे (ठाणे) तसेच महिला प्रमुख रेखा पऱ्हाड व जया पारधी तसेच पालघर, ठाणे जिल्हा सचिव, प्रत्येक तालुक्याचे अध्यक्ष, सचिव आणि उपाध्यक्ष, संघटनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते उपस्थित होते.
-------------------
मुलांचा लक्षणीय सहभाग
मी अधिक एक… आणि माझ्या आधी माझी मुले, हे ब्रीदवाक्य घेऊन राबवण्यात येणाऱ्या मोहिमेद्वारे तरुण पिढीला संघटनेशी जोडत हक्कांच्या लढ्याचे वारसदार घडवण्याचा संदेश दिला जात आहे. पायी दिंडीत महिला, तरुण, लहान मुलांचा सहभाग लक्षणीय आहे.