आईच्या डोळ्यांतून अश्रू! समोर उभा असलेला मुलगा हरवला, हृदयस्पर्शी मिलाफ, मुलगा दिसताच आईने घट्ट मिठी मारली!
esakal February 02, 2026 10:45 PM

श्रीरामपूर: रात्रीची वेळ, पोलिस ठाण्याची शांतता... अचानक आईच्या डोळ्यांतून अश्रू. समोर उभा असलेला तिचा हरवलेला मुलगा. काही तासांपूर्वी ओळख, पत्ता, नाव काहीच ठाऊक नसलेला भटकंती करणारा युवक आणि पहाटे दोन वाजता झालेला मिलाफ पाहून पोलिस कर्मचाऱ्यांच्याही डोळ्यांत पाणी तरळले. ही घटना आहे, बेलापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील उक्कलगाव येथील.

Pune News: पुण्यात नवीन शासकीय विश्रामगृह; लष्कर परिसरात ४८ कक्षांची इमारत, ३३ कोटींचा खर्च, ४८ कक्ष उपलब्ध राहणार!

वाहेगाव (ता. पैठण, जि. संभाजीनगर) येथील सोमनाथ नंदकुमार ससाणे हा मनोरुग्ण अवस्थेत घरातून निघून गेला होता. भटकत भटकत तो उक्कलगावच्या शिंदे वस्तीत पोहोचला. तेथे तो अचानक आरडाओरडा करू लागला, निरर्थक बोलू लागला. सुरवातीला गावकऱ्यांना तो चोर असावा, असे वाटले. मात्र अशोक शिंदे, शुभम शिंदे, वैभव शिंदे, प्रमोद शिंदे यांनी प्रसंगाचे गांभीर्य ओळखत तातडीने युवराज थोरात यांना कळवले.

त्यांच्या सोबत पोलिस पाटील हिराबाई मोरे, इंद्रजित मुसमाडे, मुकेश जगधने, दीपक पवार, सोन्या खेमनर घटनास्थळी पोहोचले. युवकाची अवस्था पाहून तो मनोरुग्ण असल्याचे लक्षात आले. तत्काळ बेलापूर पोलिस ठाण्याचे हवालदार संपत बडे यांना माहिती देण्यात आली. बडे घटनास्थळी पोहोचले तेव्हा युवकाच्या खिशात कोणतीही ओळखपत्रे नव्हती. नाव विचारले असता तो फक्त ‘ससाणे’ एवढेच सांगत होता.

बडे यांनी हार मानली नाही. गृहरक्षक दलाचे महेश थोरात, रणजित थोरात, हर्षल इंगळे यांच्या मदतीने त्याला पोलिस ठाण्यात आणले. नाश्ता दिला. पुन्हा तपासणी केली असता खिशात एक छोटासा कागद सापडला. त्यावर एक मोबाईल क्रमांक होता. त्या क्रमांकावर संपर्क साधला असता संबंधित व्यक्तीने सुरवातीला ओळख नाकारली. मात्र बडे यांनी पाठपुरावा केला. अखेर त्या व्यक्तीने गावातील दुसरा संपर्क दिला. त्या धाग्याने अखेर युवकाची ओळख पटली. तो सोमनाथ ससाणे असून मनोरुग्ण आहे, अशी माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या भावाशी योगेश ससाणे आणि आई अलका ससाणे यांच्याशी संपर्क साधला. मुलगा सापडला हे ऐकताच आईच्या आवाजातला आनंद शब्दात मावत नव्हता.

भावनांचा पूर

पहाटे साधारण दोन वाजता आई आणि भाऊ पोलिस स्टेशनमध्ये पोहोचले. समोर मुलगा दिसताच आईने त्याला घट्ट मिठी मारली. “पोलीसांतला माणूस आजही जिवंत आहे,” असे म्हणत अलका ससाणे यांच्या डोळ्यांतून अश्रूंचा पूर वाहू लागला. हा प्रसंग पाहून हवालदार संपत बडे आणि गृहरक्षक दलाचे जवानही गहिवरले.

Nagpur News:विदर्भ-मराठवाड्यासाठी हवी रेल्वेची ‘कनेक्टिव्हिटी’; नागपूर-छत्रपती संभाजीनगर थेट रेल्वेसेवा नाही, अर्थसंकल्पात अपेक्षा! ग्रामस्थांची सतर्कता

उक्कलगाव ग्रामस्थांची सतर्कता आणि बेलापूर पोलिसांची चिकाटी यामुळे एक कुटुंब पुन्हा एकत्र आले. ओळख नसलेला, नाव सांगता न येणारा युवक आणि केवळ ससाणे या शब्दावरून सुरू झालेला शोध अखेर आईच्या कुशीत जाऊन संपला.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.