आयुष्यात कधीही दारू प्यायलो नाही, ड्रंक अँड ड्राईव्हच्या कारवाईनंतर पुण्यातील कीर्तनकाराचा पोलिसांवर मोठा आरोप
शिवानी पांढरे February 03, 2026 02:13 AM

पुणे : आपण आयुष्यात कधीच दारू प्यायलो नाही तरी आपल्यावर ड्रंक अँड ड्राईव्हची कारवाई करण्यात आली असल्याचा आरोप पुण्यातील कीर्तनकार अमृतानंद महाराज(Amrutanand Maharaj)  यांनी पुणे पोलिसांवर केला. वाहतूक पोलिसांच्या ड्रंक अँड ड्राईव्ह मोहिमेत अन्याय झाल्याचा आरोप कीर्तनकारांनी पोलिसांवर केला. तर या प्रकरणात पोलिसांकडून काही चूक झाली असेल तर आम्ही पुन्हा खात्री करतो असं  पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितलं.

वाहतूक पोलिसांच्या ड्रंक अँड ड्राईव्ह संदर्भात पुणे पोलिसांकडून सुरू असलेल्या समुपदेशन सत्रात कीर्तनकार अमृतानंद महाराज यांनी मोठा आरोप केला. यावर आता पुणे पोलीस पु्न्हा एकदा तपास करणार आहेत. 

Amrutanand Maharaj Drunk And Drive Case : पोलीस आयुक्तांसमोर आरोप

पुणे पोलिसांकडून आज ड्रंक अँड ड्राईव्ह मोहिमेंतर्गत समुपदेशन सत्र आयोजित करण्यात आले होते. या सत्रात अमृतानंद महाराज यांनी थेट सगळ्यांसमोर उभे राहत पुणे पोलीस आयुक्तांसमोर आपली व्यथा मांडली आणि पोलिसांच्या कारवाईवर आरोप केले. मी आयुष्यात कधीच दारू प्यायलो नाही, असा दावा त्यांनी केला.

कीर्तन हाच माझा श्वास आहे. त्यामुळे कोणालाही विचारा, त्यांच्याकडून माहिती घ्या. मी कधीही दारू प्यायलो नाही असं अमृतानंद महाराज म्हणाले. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी हे सगळं ऐकून घेतलं आणि असं काही घडलं असल्यास आम्ही खात्री करतो असं सांगितलं. 

Amrutanand Maharaj Pune : काय म्हणाले अमृतानंद महाराज?

पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्यासमोर बोलताना अमृतानंद महाराज म्हणाले की, मी आयुष्यात कधीही दारू प्यायलो नाही. माझे कीर्तन यूट्यूबला पाहायला मिळतील. मुंढव्या रेल्वे ब्रिजजवळ एका गुप्ता नावाच्या मुलाने माझ्या कारला मागून धडक दिली. त्यावेळी मुंढवा पोलीस स्टेशनमध्ये माझी तपासणी करण्यात आली. पण त्या ठिकाणी मी ड्रिंक अँड ड्राईव्ह पॉझिटिव्ह निघालो. 

यावर पोलीस आयुक्तांनी लगेच पोलिसांना या प्रकाराची चौकशी करण्याचे आदेश दिले. तसेच असा प्रकार आणखी कुणासोबत झाला आहे असं उपस्थितांना विचारलं.

या प्रकरानंतर कीर्तनकार असलेल्या अमृतानंद महाराजांवर झालेली पोलीस कारवाई योग्य होती की अयोग्य होती याबाबत पोलीस पुन्हा तपास करणार आहेत. मात्र, कीर्तनकारांनी पुणे पोलिसांवर केलेल्या आरोपांमध्ये जर तथ्य असेल तर ही पुणे पोलिसांची गंभीर चूक असेल अशी चर्चा आहे. 

ही बातमी वाचा:

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.