पाणी नाही, उत्तर नाही! ६८ वर्षीय जेष्ठ नागरिकाचा उघड्या अंगाने पाणीपुरवठा कार्यालयात ठिय्या
esakal February 03, 2026 10:45 PM

ज्येष्ठ नागरिकाचे पाणीपुरवठा कार्यालयात अर्धनग्न आंदोलन
वारंवार तक्रार करूनही उत्तर नाही नागरिकाचा ठिय्या
उल्हासनगर, ता. ३ (वार्ताहर) : उल्हासनगर कॅम्प नंबर ४ मध्ये सलग पाच दिवस पाणीपुरवठा ठप्प झाल्याने ६८ वर्षीय ज्येष्ठ नागरिक राजाराम पवार यांनी संताप व्यक्त केला होता. अनेकदा तक्रार करूनही पाणीपुरवठा विभागाने दुर्लक्ष केल्याने राजाराम पवार यांनी कार्यालयात अर्धनग्न आंदोलन केले आणि प्रशासनाचा निषेध नोंदवला.
प्रभाग क्रमांक १४ मध्ये गेल्या पाच दिवसांपासून पाणीपुरवठा ठप्प झाल्याने नागरिकांची दैनंदिन कामे विस्कळित झाली होती. याबाबत राजाराम पवार यांनी सलग तीन दिवस पाणीपुरवठा कार्यालयात जाऊन विचारणा केली. मात्र, प्रत्येक वेळी अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरे मिळाल्याचे त्यांनी सांगितले. वारंवार कार्यालयात जाऊनही ठोस उत्तर न मिळाल्याने राजाराम पवार यांनी पाणीपुरवठा कार्यालय गाठत अर्धनग्न आंदोलन केले. या घटनेनंतर अखेर प्रशासनाला जाग आली असून, सोमवारी (ता. २) रात्री संबंधित परिसरात टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला, तर मंगळवारी (ता. ३) सकाळी नियमित पाणी आले.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.