ज्ञानदा रामतीर्थकरने पहिल्यांदा प्रेमाबद्दल घरी सांगताच वडिलांनी दिलेली अशी प्रतिक्रिया; म्हणाली, 'साखरपुड्याच्या दिवशी जाणवलं की...'
esakal February 03, 2026 10:45 PM

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर हिने आपल्या अभिनयाने आणि सोज्वळ चेहऱ्याने चाहत्यांच्या मनात घर केलंय. ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ मालिकेत ती काव्याच्या भूमिकेत दिसतेय. 'ठिपक्यांची रांगोळी' या मालिकेतीलही तिची भूमिका चांगलीच गाजली होती. ज्ञानदा लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. तिच्या पतीचं नाव हर्षद असून ते गेले काही वर्ष एकमेकांना डेट करत होते. जेव्हीज ज्ञानदाने तिच्या अफेअरबद्दल घरच्यांना सांगितलं तेव्हा त्यांची काय प्रतिक्रिया होती हे तिने एका मुलाखतीत सांगितलंय.

ज्ञानदा आणि हर्षद यांनी नुकतीच राजश्री मराठीला मुलाखत दिली. यात बोलताना ज्ञानदा म्हणाली, 'अर्थात सर्वात आधी हर्षदने त्याच्या घरी आमच्याबद्दल सांगितलं होतं. मी घरी सांगण्यासाठी थोडा वेळ घेतला होता. पण, जे काही सांगेन ते मीच सांगेन हे मी ५०० टक्के ठरवलं होतं. त्यांना ज्यावेळी आमच्याबद्दल सांगितलं होतं, तेव्हा ते म्हणाले होते की, वेळ घे… प्रत्येक गोष्टीचा विचार कर. तुझं जेव्हा फायनल ठरेल तेव्हा आपण बोलू असं आमचं बोलणं झालं होतं. हे सगळं मला साखरपुड्याच्या दिवशी जाणवलं की, कोणत्याही आई-बाबांसाठी पटकन होकार देणं हे सोपं नाहीये. जोपर्यंत सगळे ‘हो’ म्हणत नाहीत तोपर्यंत लग्न करायचं नाही हे आमचं ठरलंच होतं. या काळात मग आम्ही दोघांनी करिअरकडे लक्ष दिलं.'

ती पुढे म्हणाली, 'माझ्या आई-बाबांनी इतका वेळ घेतला कारण, त्यांच्या मनात बरेच प्रश्न होते. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, आम्ही दोघं एकाच क्षेत्रात काम करतो…त्यामुळे आर्थिक नियोजन कसं असेल वगैरे हा सगळ्यात मोठा मुद्दा होता. तुमचे भविष्याबद्दल काय-काय विचार आहेत ते आम्हाला सांगा असं सगळं माझ्या आई-बाबांचं म्हणणं होतं. मग, काही दिवसांनी त्यांना आमच्या नात्याबद्दल एक विश्वास निर्माण झाला. याशिवाय हर्षद नेहमी मला माझ्या कामात सपोर्ट करतोय हे त्या दोघांनीही पाहिलंय. साखरपुड्याला आम्ही एकमेकांच्या हातात अंगठ्या घातल्या तेव्हा माझी आई प्रचंड खूश होती. पण, माझे बाबा खूप रडत होते. त्यांना समजावून सांगण्यासाठी हर्षद पुढे गेला होता. त्या क्षणाला मला जाणवलं की, आपले बाबा आपला किती विचार करतात.'

'द अजित पवार' मध्ये कोण साकारणार मुख्य भूमिका? स्वतः अजित दादांनी सांगितलेलं नाव; म्हणालेले-
© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.