Ahilyanagar Politics: अहिल्यानगर महापालिकेत महापौर राष्ट्रवादीचा; उपमहापौरपद भाजपकडे, नेमक्या काय घडामाेडी घडल्या!
esakal February 03, 2026 10:45 PM

अहिल्यानगर: गेल्या अनेक दिवसांपासून उत्सुकता लागलेल्या महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौरपदाच्या उमेदवारांचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भारतीय जनता पक्ष युतीकडून महापौरपदासाठी राष्ट्रवादीच्या नगरसेविका ज्योती गाडे यांनी, तर उपमहापौरपदासाठी भाजपचे धनंजय जाधव यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. दोनच उमेदवारांचे अर्ज दाखल झाल्याने त्यांच्या निवडीची औपचारिक घोषणा आता शुक्रवारी (ता. ६) केली जाणार आहे.

सोलापूरला बुलेट ट्रेनचे ऐतिहासिक गिफ्ट! पुणे एक तासात, हैदराबाद सव्वा, तर मुंबई अडीच तासांत गाठणे होणार शक्य..

दोन्ही उमेदवारांनी आपले अर्ज नगरसचिव मेहेर लहारे यांच्याकडे सुपूर्द केले. यावेळी दोन्ही पक्षांचे पदाधिकारी, नगरसेवक, नगरसेविका मोठ्या संख्येने उपस्थित होते. माजी महापौर बाबासाहेब वाकळे, माजी उपमहापौर गणेश भोसले, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर, भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते, स्थायी समितीचे माजी सभापती अविनाश घुले, नगरसेवक निखिल वारे, विपुल शेटिया, पुष्कर कुलकर्णी, तसेच नगरसेविका पुष्पा बोरुडे, संध्या पवार, गीतांजली काळे, शारदा ढवण, दीपाली बारस्कर, करण कराळे आदी उपस्थित होते.

उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर महापौरपदाच्या उमेदवार गाडे म्हणाल्या की, अहिल्यानगरचे नाव बदलल्यानंतर शहराच्या पहिल्या महापौरपदाचा मान मला मिळत आहे, ही माझ्यासाठी मोठी जबाबदारी आहे. अहिल्यादेवी होळकरांचा आदर्श व वारसा अखंड ठेवण्यासाठी मी काम करेल. माझे वडील स्व. शिवाजीराव कर्डिले आज हयात असते, तर त्यांना मोठा आनंद झाला असता. त्यांचा वारसा आणि विचार पुढे नेण्यासाठी मी कटिबद्ध आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार संग्राम जगताप आणि माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरविण्याचा मी प्रयत्न करीन.

उपमहापौरपदाचे उमेदवार जाधव म्हणाले की, केंद्र, राज्य आणि शहर या तिन्ही पातळ्यांवर राष्ट्रवादी-भाजप युतीचे सत्ताधारी समीकरण आहे. नगरकरांना उत्तम सेवा देणे, हीच आपली प्राथमिकता आहे. मूलभूत सुविधांपासून विकासाच्या योजना नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सर्व नगरसेवकांना सोबत घेऊन कार्य करणार आहे. युतीच्या नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील राहीन. त्यांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास मी सार्थ ठरवेल.

विखे, जगताप यांच्याकडून शिक्कामाेर्तब

महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडीसाठी सोमवारी (ता. २) सकाळी शहरातील एका हॉटेलमध्ये पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार संग्राम जगताप, माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्यासह राष्ट्रवादी व भाजप युतीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत गाडे व जाधव यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यानंतर दोन्ही उमेदवार व युतीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी महापालिकेत आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. यावेळी युतीचे नगरसेवकही उपस्थित होते.

Balasaheb Thorat: अजितदादांच्या आकस्मिक निधनाने महाराष्ट्राची हानी: बाळासाहेब थोरात, बारामतीत पवार कुटुंबीयांची सांत्वनपर भेट! सव्वा वर्षाचा फॉर्म्युला

पालकमंत्री विखे पाटील यांनी महापौर आणि उपमहापौरपदासाठीच्या बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी महापौर व उपमहापौरपदासाठी सव्वा वर्षाचा फॉर्म्युला ठरविण्यात आला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पहिले अडीच वर्षे महापौरपद राष्ट्रवादीकडे, तर उपमहापौरपद भाजपकडे असेल. त्यानंतर मुख्यमंत्री आणि युतीच्या नेत्यांशी चर्चा करून पुढील अडीच वर्षांचे नियोजन केले जाईल, असे ते म्हणाले. त्यामुळे आगामी काळात युतीच्या अनेक प्रबळ दावेदारांना महापौर आणि उपमहापौरपदाची संधी मिळणार आहे, तसेच विखे पाटील यांनी राष्ट्रवादी-भाजप युतीचे हे दमदार यश असल्याचे सांगत स्व. अजितदादा पवार यांच्या निधनामुळे या निवडीचा कोणताही उत्सव साजरा करण्यात येणार नसल्याचे सांगितले.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.