'माझं नाव घ्यायचा काय संबंध, या सर्व चर्चेत ते कुठेच नव्हते', विलीनीकरणाबाबबच्या फडणवीसांच्या वक्तव्यावर शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
जयदीप भगत, बारामती February 04, 2026 01:13 PM

बारामती: राष्ट्रवादी काँग्रेस नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या (Ajit pawar) अकाली निधनानंतर राजकीय वर्तुळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणावरून चर्चा सुरू आहे. त्यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटांमधील संभाव्य विलीनीकरणाबाबत दावे-प्रतिदावे केले जात आहेत. याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांचे नेते बैठका झाल्याचे, चर्चा फायनल झाल्याचे आणि घोषणा करण्याची तारीख ठरल्याचे सांगत होते, त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीही या वादात उडी घेत आपली प्रतिक्रिया दिली, यामुळे राजकारण अधिकच तापले आहे. विलीनीकरणाची शक्यता फडणवीस यांनी फेटाळून लावल्यानंतर, राष्ट्रवादी (शदरचंद्र पवार) पक्षाचे प्रमुख शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज माध्यमांशी बोलताना फडणवीसांना कडक शब्दांत प्रत्युत्तर दिल्याचं दिसून आलं. (Devendra Fadnavis) 

या सर्व चर्चेत ते कुठेच नव्हते

विलीनीकरणाच्या संदर्भात जी चर्चा झाली आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं, विलीनीकरणाचा मुद्दा असता तर अजित पवारांनी मला सांगितलं असतं, त्याची कल्पना मला दिली असती, जर विलीनीकरणाचा मुद्दा होता तर ते एनडीएसोबत आले असते का? यावर उत्तर देताना शरद पवार म्हणाले, फडणवीस यांनी माझं नाव घ्यायचा काय संबंध आहे , या सर्व चर्चेत ते कुठेच नव्हते, त्यामुळे त्यांना याबाबत भाष्य करण्याचा काही अधिकार आहे, असं मला वाटतं नाही, असंही पुढे ते म्हणालेत. अजित दादा आणि जयंत पाटील विलीनीकरणाच्या बाबत चर्चा करत होते, असंही ते म्हणालेत. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाच्या प्रश्नावर पवारांनी बोलणं टाळलं आहे, तर सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री झाल्या म्हणून मी त्यांना खुशीने आशीर्वाद देईल असंही ते पुढे म्हणालेत.

मुख्यमंत्री नेमकं काय म्हणालेले?

अजित पवार हे आमच्या सरकारमध्ये होते; पण माझ्याशी त्यांचे व्यक्तिगतही खूप चांगले संबंध होते. ते सर्व गोष्टी माझ्याशी शेअर करायचे. अजित पवार जर समजा दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्रीकरणाची चर्चा करत असतील, एकत्रीकरणाची तारीखही ठरली असेल तर ते मला सांगणार नाहीत का? किंबहुना एकत्रीकरणाची चर्चा भाजपसोबत करणार नाहीत का? असा सवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. अजित पवार आणि शरद पवार यांच्यादरम्यान विलिनीकरणाबाबत नेमके काय बोलणे झाले हे मला माहिती नाही. अशा प्रकारची कोणती तारीख ठरली होती, त्याची माहिती मला नाही. सध्याच्या दुःखद प्रसंगी याबाबतचे राजकारण करणे मला योग्य वाटत नाही, नाही तर मीही अनेक गोष्टी सांगू शकतो; पण ते मी करणार नाही, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

दादा माझ्याशी सर्व गोष्टी शेअर करायचे

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस हे स्वतंत्र पक्ष आहेत. त्यांचे निर्णय हे सर्वस्वी तेच घेत असतात. त्याच्यात आमचा कोणताही हस्तक्षेप नसतो; पण अजितदादांचा पक्ष सरकारमध्ये आहे. असा कोणताही निर्णय ते घेणार असते, तर त्यांनी आमच्याशी चर्चा निश्चित केली असती. ते जर चर्चा करत होते म्हणजे सरकारमधून ते बाहेर पडणार होते का? सरकार तर स्थिर आहे. त्यांचे आणि शरद पवारांचे काय बोलणे झाले मला माहिती नाही; पण अशा प्रकारची तारीख ठरल्याची मला माहिती नाही. तसेच अजितदादांचे आणि माझे वैयक्तिक संबंध खूप वेगळे होते. त्यांच्या मृत्यूच्या आदल्या दिवशीच आम्ही एक तास गप्पा मारल्या होत्या, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.