T20 Ranking : इशान किशनने एका मालिकेत केली कमाल, 32 खेळाडूंना झटक्यात टाकलं मागे
GH News February 04, 2026 07:13 PM

टी20 वर्ल्डकप स्पर्धेचा थरार पुढच्या एक महिनाभर रंगणार आहे. प्रत्येक सामन्यानंतर समीकरण बदलताना दिसणार आहे. त्यामुळे या स्पर्धेची रंगत उत्तरोउत्तर वाढत जाणार यात काही शंका नाही. असं असताना टी20 वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी आयसीसीने टी20 क्रमवारी जाहीर केली आहे. या क्रमवारीत भारतीय खेळाडूंचा वरचष्मा आहे. फलंदाजांच्या यादीत अभिषेक शर्मा अव्वल स्थानी विराजमान आहे. तर कर्णधार सूर्यकुमार यादवलाही फायदा झाला आहे. फॉर्मात असलेल्या इशान किशनने तर कमालच केली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन झाल्यानंतर पहिल्याच मालिकेत छाप सोडली. त्याचे सकारात्मक परिणाम आयसीसी क्रमवारीत दिसून आला आहे. त्याने 32 फलंदाजांना मागे टाकत क्रमवारीत आघाडी घेतली आहे. दुसरीकडे, संजू सॅमसनच्या पदरी निराशा पडली. त्याची कामगिरी पाहता फटका बसणार हे निश्चित होतं. झालंही तसंच.. टी20 क्रमावारीतील एकंदरीत स्थिती समजून घेऊयात.

अभिषेक शर्मा आणि सूर्यकुमार यादव टॉप 10 मध्ये

अभिषेक शर्माने टी20 क्रिकेटमधील फॉर्म आणि आक्रमक बाणा कायम ठेवला आहे. त्याचा फायदा त्याला आयसीसी क्रमवारीत दर आठवड्याला होताना दिसत आहे. आता 917 रेटिंग प्वाइंटसह अभिषेक शर्मा टॉपला आहे. तिलक वर्मा न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत खेळला नाही. त्यामुळे एका स्थानाचं नुकसान झालं असून चौथ्या क्रमांकावर आहे. सूर्यकुमार यादवने कमाल फलंदाजी केली. त्यामुळे सातव्या स्थानावरून सहाव्या स्थानी पोहोचला आहे.

दुसरीकडे, इशान किशनने 32 फलंदाजांना मागे टाकून 32वं स्थान मिळवलं आहे. गेल्या दोन वर्षांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर होता. पण इशानने पहिल्याच मालिकेत कमाल केली. न्यूझीलंडविरुद्ध शतक आणि अर्धशतक ठोकत मोठी झेप घेतली आहे. टी20 वर्ल्डकप स्पर्धेत प्लेइंग 11 मध्ये स्थान मिळालं आणि अशीच कामगिरी केली तर नक्कीच टॉप 10 मध्ये जागा मिळवू शकतो. संजू सॅमसनला सुमार फलंदाजीचा फटका बसला आहे. त्यामुळे त्याची 51 व्या स्थानावर 56व्या स्थानी घसरण झाली आहे. अष्टपैलू शिवम दुबेने 17 खेळाडूंना मागे टाकत 41वं स्थान गाठलं आहे. गोलंदाजांच्या यादीत वरुण चक्रवर्ती पहिल्या स्थानावर आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.