मोठी बातमी! पुणे-मुंबई आणि मुंबई-पुणे महामार्गावरची वाहतूक अखेर सुरळीत; तब्बल 32 तासांच्या प्रयत्नानंतर गॅस टँकर हटवण्यात यश
इशान देशमुख February 05, 2026 09:43 AM

Mumbai Pune Expressway : पुणे-मुंबई आणि मुंबई-पुणे महामार्गावरची वाहतूक (Mumbai Pune Highway Traffic) पुन्हा एकदा सुरळीत सुरु झाली आहे. तब्बल 32 तासांच्या प्रयत्नानंतर पडलेला गॅस टँकर अखेर हटवण्यात यश आलं आहे. मुंबई–पुणे मार्गावरील (Mumbai Pune Expressway) अपघातग्रस्त गॅस टँकर अखेर तब्बल 32 तासांच्या अथक प्रयत्नांनंतर रस्त्यावरून हटवण्यात प्रशासनाला यश आले आहे. टँकर हटवण्याची प्रक्रिया अत्यंत सावधगिरीने पार पाडण्यात आली. टँकरमध्ये काही प्रमाणात गॅस शिल्लक असल्याची शक्यता असल्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी फायर ब्रिगेडच्या गाड्यांकडून सतत पाण्याचा मारा करण्यात येत होता. संपूर्ण परिसरात सुरक्षा व्यवस्था कडक ठेवण्यात आली होती. या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये पोलीस यंत्रणा, एनडीआरएफची टीम, फायर ब्रिगेडचे जवान, ओएनजीसीमधील तज्ज्ञ पथक, सीआयएसएफचे जवान तसेच स्थानिक स्वयंसेवक यांनी समन्वयाने काम केले. सर्व यंत्रणांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे संभाव्य मोठा धोका टळला. (Mumbai Pune Expressway Traffic Update)

Mumbai Pune Expressway Traffic Update : तब्बल 32 तासांच्या प्रयत्नानंतर गॅस टँकर हटवण्यात यश

दरम्यान, तीन मोठ्या क्रेनच्या मदतीने टँकर उचलण्यात आलाय. या घटनेमुळे दीर्घकाळ विस्कळीत झालेली वाहतूक आता टप्प्याटप्प्याने पूर्वपदावर येऊ असून वाहतूक पुन्हा एकदा सुरळीत सुरु झाली आहे. प्रशासनाकडून घेतलेल्या खबरदारीमुळे मोठी दुर्घटना टळल्याचे चित्र या संपूर्ण कारवाईदरम्यान पाहायला मिळाले. मात्र या एका अपघातामुळे प्रवाश्यांना मोठ्या त्रासाला समोर जावं लागलं आहे.

Mumbai Pune Expressway Traffic : अपघातामुळं तब्बल 25 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा, प्रवाशांना प्रचंड त्रास

दरम्यान, मंगळवारी संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर आडोशी बोगद्याजवळ ज्वलनशील गॅसचा टँकर पलटी झाला होता. त्यामुळे या महामार्गावर वाहतूक कोंडी झाल्याचं दिसून आलं. या घटनेसंबंधी प्रशासनाने कोणताही खबरदारीच्या सूचना दिल्याने ही कोंडी झाल्याचं सांगितलं गेलंय. त्याचा फटका बुधवारी पहाटे मुंबईच्या दिशेने निघालेल्या प्रवाशांना झाला आणि दिवसभर त्यांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागला. या अपघातामुळं तब्बल 25 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या असून, अनेक प्रवासी वाहनांमध्ये अडकून पडले आहेत. या कोंडीत रुग्ण, ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, महिला व पुरुष अशा सर्वांनाच प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.

एकीकडे वाहनांच्या तुडुंब रांगा लागलेल्या असताना, प्रवाशांच्या होणाऱ्या हालअपेष्टांकडे दुर्लक्ष करत, टोल वसूलीची धाड मात्र सुरूच असल्याची तक्रार प्रवाशांनी केली. या कोंडीत अडकलेल्या प्रवाशांना मात्र कोणीच वाली उरलेला नाही. टोल घेणारे आणि प्रशासन चालवणाऱ्यांनी प्रवाशांना वाऱ्यावर सोडल्याचं चित्र बघता नागरिकांकडून रोष व्यक्त करण्यात आला. मात्र आता अखेर तब्बल 32 तासांच्या प्रयत्नानंतर पडलेला गॅस टँकर अखेर हटवण्यात यश आलं आहे. परिणामी पुणे-मुंबई आणि मुंबई-पुणे महामार्गावरची वाहतूक पुन्हा एकदा सुरळीत सुरु झाली आहे.

हे हि वाचा

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.