कोपर्डे हवेली : अपक्ष उमेदवारांना निवडून देण्याचे रामकृष्ण वेताळ यांचे आवाहन
esakal February 05, 2026 09:45 AM

कोपर्डे हवेली गटाच्या विकासासाठी संधी द्या

रामकृष्ण वेताळ; तिन्ही अपक्ष उमेदवारांना साथ देण्याचे आवाहन

कोपर्डे हवेली, ता. ४ : कोपर्डे हवेली जिल्हा परिषद गटाला विकासाचे आदर्शस्थान बनवण्यासाठी आणि शाश्वत प्रगतीसाठी सर्वांनी साथ द्यावी, असे आवाहन कऱ्हाड उत्तरचे युवा नेते रामकृष्ण वेताळ यांनी केले. कोपर्डे हवेली गटातील तिन्ही अपक्ष उमेदवारांना निवडून देण्याचे त्यांनी आवाहन केले.
कोपर्डे हवेली जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार विद्या वेताळ, कोपर्डे पंचायत समिती गणाचे उमेदवार अमित पाटील आणि वाघेरी गणाच्या उमेदवार नीलम पिसाळ यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. सभेच्या अध्यक्षस्थानी संजय पाटील होते. श्री. वेताळ म्हणाले, ‘‘विकास कसा करायचा, हे मला शिकवण्याची गरज नाही. जिल्हा परिषद आणि शासकीय योजनांमधून या भागासाठी सर्वाधिक निधी कसा मिळवायचा, हे मला चांगले माहीत आहे. कऱ्हाड तालुका सुसंस्कृत जनतेचा आहे, हा कोणाच्या दमदाटीला भीक घालत नाही. सर्वसामान्य जनतेची गळचेपी करून राजकारण करणाऱ्यांना जनता कधीच माफ करणार नाही. कोपर्डे हवेली गट जिल्ह्यात आदर्श बनवण्यासाठी मी प्रयत्नशील राहणार आहे. साड्या-डबे वाटून राजकारण होत नाही. आपल्या सर्वांच्या साथीने कऱ्हाड तालुका पंचायत समितीचा सभापती आपलाच होईल.’’
संजय पाटील यांनी रामकृष्ण वेताळ यांनी पद नसतानाही राबवलेल्या उपक्रमांची माहिती दिली.
विद्या वेताळ, अमित पाटील आणि नीलम पिसाळ यांच्या पाठीशी स्वाभिमान जपण्यासाठी उभे राहण्याची वेळ आली आहे, असेही त्यांनी सांगितले.
विद्या वेताळ, अमित पाटील आणि नीलम पिसाळ यांनीही आपले विकासाचे व्हिजन मांडले. संजय पिसाळ यांनी प्रास्ताविक केले. उपसरपंच अधिकराव पिसाळ यांनी आभार मानले. या वेळी कोयना दूध संघाचे संचालक सुदाम चव्हाण, कामथीचे सरपंच सुरेश खंडागळे, ज्येष्ठ नेते भानुदास पोळ, श्रीरंग चव्हाण, देवदत्त चव्हाण, रंगराव चव्हाण, माजी पंचायत समिती सदस्य सुरेश कुंभार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

26B02386
करवडी ः येथे प्रचार सभेमध्ये बोलताना रामकृष्ण वेताळ. समोर जनसमुदाय.
(जयंत पाटील : सकाळ छायाचित्रसेवा)

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.