बॉक्स ऑफिस हादरणार! ‘मिर्झापूर द मूवी’ मोठ्या पडद्यावर येतेय, रिलीज डेट जाहीर; गादीसाठी पुन्हा रक्तपात
abp majha web team February 05, 2026 04:13 PM

Mirzapur: अखेर प्रेक्षकांची प्रतीक्षा संपली आहे. ‘मिर्झापूर’ या लोकप्रिय वेबसीरिजच्या तिसऱ्या सिझनच्या वेळीच निर्मात्यांनी ‘मिर्झापूर द मूवी’ची (Mirzapur the Movie) घोषणा केली होती. विशेष म्हणजे या चित्रपटात सीझन 2 आणि सीझन 3 मध्ये मृत्युमुखी पडलेली पात्रदेखील पुन्हा दिसणार असल्याचं तेव्हाच स्पष्ट करण्यात आलं होतं. त्यामुळे या सिनेमाबाबत चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती. चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच त्याच्या रिलीजची जोरदार चर्चा सुरू होती. आता निर्मात्यांनी अखेर ‘मिर्झापूर द मूवी’ कधी आणि कुठे प्रदर्शित होणार आहे, यावर पडदा उचलला आहे.

मोठ्या पडद्यावर मिर्झापूरचा धुमाकूळ

काही दिवसांपूर्वीच ‘मिर्झापूर द मूवी’चं शूटिंग पूर्ण झालं असून आता चित्रपटाच्या प्रदर्शनाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. महत्त्वाचं म्हणजे हा सिनेमा ओटीटीवर नाही, तर थेट सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. मोठ्या पडद्यावर मिर्झापूरचा दबदबा कधी पाहायला मिळणार, याची अधिकृत घोषणा खुद्द फरहान अख्तर यांनी केली आहे.

धडकी भरवणारा पोस्टर व्हायरल

फरहान अख्तर यांच्या प्रॉडक्शन हाऊसच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून ‘मिर्झापूर द मूवी’चा अधिकृत पोस्टर शेअर करण्यात आला आहे. या पोस्टरमध्ये सिंहासन ओढताना दिसत असून, वाळवंटात गाड्यांचा ताफा आणि हातात शस्त्रं घेतलेले लोक पाहायला मिळतात. या दृश्यावरून पुन्हा एकदा गादीसाठी निर्दय संघर्ष आणि रक्तपात होणार, हे स्पष्ट होतं. द मिर्झापूर मूवीच्या प्रदर्शनाची तारीखही निर्मात्यांनी सांगितली आहे. हा सिनेमा 4 सप्टेंबर २०२६ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Excel Entertainment (@excelmovies)

दमदार स्टारकास्ट

या सिनेमात पंकज त्रिपाठी, अली फजल आणि दिव्येंदु शर्मा यांच्यासह अनेक लोकप्रिय कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. यात जितेंद्र कुमार, रवि किशन, अभिषेक बॅनर्जी, रसिका दुग्गल, श्वेता त्रिपाठी, श्रिया पिलगांवकर, हर्षिता गौर, सुशांत सिंह, मोहित मलिक, शीबा चड्ढा, राजेश तैलंग, कुलभूषण खरबंदा आणि सोनल चौहान यांचा समावेश आहे. एकूणच, वेबसीरिजमधून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा ‘मिर्झापूर’ आता मोठ्या पडद्यावर कोणता कहर करणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.