संसदेत विरोधी पक्षाला बोलू दिले जात नाही, माईक बंद केले जातात; सभागृहातील गोंधळावरुन वर्षा गायकवाड संतापल्या
abp majha web team February 06, 2026 12:13 AM

नवी दिल्ली : लोकसभेतील कामकाज बंद पाडण्यात सत्ताधारी पक्षच आघाडीवर आहे. विरोधी पक्षाला बोलू दिले जात नाही, त्यांचे माईक बंद केले जातात. सत्ताधाऱ्यांसाठी वेगळे नियम आणि विरोधकांसाठी वेगळे नियम आहेत असे चित्र आहे. विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul gandhi) बोलत असताना लोकसभेचे (Parliment) अध्यक्ष ओम बिर्ला सातत्याने बोलण्यापासून रोखत होते, त्यांचा माईक बंद करत होते. पण भाजपा खासदार निशिकांत दुबे बोलताना त्यांना रोखले नाही. दुबेनी शिष्टाचाराच्या सर्व मर्यादा ओलांडल्या असतानाही, लोकसभा अध्यक्षांनी त्यांना थांबवले नाही. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचे हे वर्तन पक्षपाती असून लोकशाहीची हत्या करणारे आहे, असा आरोप काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड (Varsha gaikwad) यांनी केला आहे.

संसदेतील कामकाजावर प्रसार माध्यमांशी बोलताना खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या की, भाजपाचा मुजोर खासदार निशिकांत दुबेने पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु तसेच इंदिरा गांधींबद्दल अत्यंत आक्षेपार्ह भाषा वापरली परंतु लोकसभा अध्यक्षांनी त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली नाही. मी आणि माझ्या काही सहकारी महिला खासदारांनी निशिकांत दुबेला जाब विचारण्याचा प्रयत्न केला असता आमच्या प्रश्नांची उत्तरे देण्याऐवजी दुबे धूम ठोकून पळाला. जेव्हा संसदेच्या प्रतिष्ठेचा आणि महिलांच्या सन्मानाचा प्रश्न येतो, तेव्हा नियम सर्वांसाठी समान असले पाहिजेत. पंडित नेहरु व इंदिरा गांधी यांच्याबद्दल निशिकांत दुबेने जी भाषा वापरली त्याबद्दल त्याला निलंबित केले पाहिजे, अशी मागणी खासदार वर्षा गायकवाड यांनी केली आहे.

संसदेत विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष दोन्ही समान व तेवढेच महत्त्वाचे आहेत. परंतु गेल्या तीन-चार दिवसांपासून एक खेळ पद्धतशिरपणे खेळला जात  आहे. जेव्हा भाजपा खासदार निशिकांत दुबे बोलायला उभे राहतात, तेव्हा त्यांचा मायक्रोफोन नेहमी चालू असतो पण जेव्हा विरोधक बोलतात, तेव्हा त्यांचे मायक्रोफोन वारंवार बंद केले जातात. आम्ही हा मुद्दा उपस्थित केला आणि सांगितले की हे योग्य नाही, आणि कारवाई केली पाहिजे. जेव्हा त्यांना बोलायची परवानगी देण्यात आली, तेव्हा त्यांनी नकार दिला. मग ते तिथे कसे उभे राहिले? त्यांचा मायक्रोफोन अजूनही चालू कसा होता? आम्हाला 4 वाजता भेटण्याची वेळ दिली, आम्ही दुपारी 4 वाजता पोहोचलो, पण काहीच तोडगा निघाला नाही. मग सायंकाळी 5 वाजेपर्यंत तोडगा काढला जाईल असे सांगितले पण काहीच झाले नाही. काँग्रेस नेत्यांबद्दल जर कोणी अपशब्द वापरला तर तो आम्ही खपवून घेणार नाही, असा इशाराही खासदार वर्षा गायकवाड यांनी दिला.

काँग्रेस, मोदी की कब्र खोदने के सपने देखती है; राज्यसभेतून मोदींचा घणाघात, नेहरू, इंदिरा गांधींचाही उल्लेख

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.