Meghalaya Coal Mine Blast शिलाँग : मेघालय राज्यात एक मोठी दुर्घटना घडली आहे. मेघालयातील एका अवैध कोळसा खाणीत स्फोट झाल्यानं 18 जणांचा मृत्यू झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. या घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना 2-2 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. मेघालयमधील जयंतिया हिल्स जिल्ह्यात कोळसा खाणीत स्फोट झाला. यात जवळपास 18 जणांचा मृत्यू झाला.
अधिकृत माहितीनुसार, मेघालयमधील जयंतिया हिल्स अवैध कोळसा खाणीत झालेल्या स्फोटात 18 जणांचा मृत्यू झाला. तर, इतर अनेक जण अडकले असण्याची शक्यता आहे. पोलीस महासंचालक आई नोंगरंग यांनी माहिती दिली आहे. ही घटना थांगस्कू भागात घडली. बचाव कार्य सुरु आहे. आमच्या हाती 16 मृतदेह लागले आहेत. स्फोट झाला तेव्हा खाणीत किती लोक उपस्थित होते, यासंदर्भात माहिती उपलब्ध झाली नाही.
पंतप्रधान कार्यालयानं नरेंद्र मोदी यांची पोस्ट शेअर केली आहे. मेघालयमधील पूर्व जयंतिया हिल्समध्ये झालेल्या दुर्घटनेनं व्यथित झाल्याचं नरेंद्र मोदी म्हणाले. ज्यांनी या घटनेत जीव गमावले त्यांच्या प्रति मोदींनी सहवेदना व्यक्त केल्या आहेत. या घटनेत जे जखमी झाले त्यांनी लवकर बरं व्हावं, अशी प्रार्थना करत असल्याचं मोदींनी म्हटलं. पंतप्रधान राष्ट्रीय मदतनिधीतून मृतांच्या नातेवाईकांना 2 लाख रुपये दिले जाणार आहेत, तर जखमींना उपचारासाठी 50 हजार रुपये दिले जाते.
पूर्व जयंतिया हिल्सचे पोलीस अधीक्षक विकास कुमार यांनी म्हटलं की एका जखमी व्यक्तीला प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आलं आहे. ज्यानंतर पुढील उपचारांसाठी राजधानी शिलाँगला पाठवण्यात आलं.
ज्या ठिकाणी दुर्घटना झाली ती कोळसा खाण अवैधरित्या चालवली जात होती का असं विचारलं असता विकास कुमार यांनी तसंच वाटत असल्याचं म्हटलं. या स्फोटाचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. राष्ट्रीय हरित प्राधिकरणानं 2014 मध्ये मेघालयात रेट होल कोळसा खाणींवर बंदी घातली होती.