सासवड, ता. ५ : सासवडच्या मातीशी आणि इथल्या माणसांशी नाते जपणारे, लाडके लोकनेते दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अस्थिकलशाचे दर्शन घेताना सासवडकर भावुक झाले. गुरुवारी (ता. ५) सकाळी सासवड (ता. पुरंदर) येथील ऐतिहासिक शिवतीर्थावर हा अस्थिकलश दर्शनासाठी ठेवण्यात आला होता. यावेळी हजारो नागरिकांनी दादांच्या आठवणींना उजाळा देत साश्रू नयनांनी लाडक्या नेत्याला अखेरचा प्रणाम केला.
सकाळी अस्थिकलश शिवतीर्थावर दाखल होताच समाजातील सर्व स्तरांतील लोकांनी आपल्या कामाचा धडाका लावणाऱ्या नेत्याचे दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती. विशेषतः महिला आणि ज्येष्ठ नागरिकांच्या डोळ्यांत आपल्या हक्काच्या माणसाला गमावल्याचे दुःख स्पष्टपणे जाणवत होते. शाळा आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून या लोकनेत्याला पुष्पांजली अर्पण केली.
याप्रसंगी नगराध्यक्षा आनंदीकाकी जगताप, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष जालिंदर कामठे, ग्रामीण संस्थेच्या अध्यक्षा राजवर्धिनी जगताप, राष्ट्रवादीचे पुरंदर- हवेली विधानसभा अध्यक्ष वामनराव जगताप, माजी नगराध्यक्ष दत्तानाना जगताप, अॅड. कला फडतरे, माजी उपनगराध्यक्ष संजय ग. जगताप, सोमेश्वरचे माजी संचालक अरुण जगताप, श्यामकांत भिंताडे, मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण, प्राचार्य डॉ. पंडित शेळके, प्राचार्य इस्माईल सय्यद, उमेश जगताप, बंडूकाका जगताप, भानूकाका जगताप, महेश जगताप, नवनाथ बोरावके, सयाजी वांढेकर, राजेंद्र गिरमे, ज्ञानेश्वर जगताप, डॉ. राजेश दळवी, अनिल जगताप आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.
06368, 06369