वाल्हे, ता. ५ : वाल्हे (ता. पुरंदर) येथील हनुमानवस्ती परिसरात बुधवारी (ता. ४) रात्री बिबट्याचे अचानक दर्शन झाले. यामुळे शेतकरी व शेतमजुरांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक दिवसांपासून बिबट्याच्या हालचाली नसल्याने नागरिक निर्धास्त झाले होते. मात्र बुधवारी बिबट्याने पुन्हा परिसरात एन्ट्री केल्याने भीतीचे सावट पसरले आहे.
वाल्हे (ता. पुरंदर) नजीक हनुमानवस्ती परिसरात ट्रॅक्टरच्या सहाय्याने नांगरणी करत असताना एकोणीस वर्षीय गौरव इंद्रजित पवार याच्यासमोर शेजारील मका पिकातून अचानक बिबट्या समोर आला. यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. ट्रॅक्टरसमोर बिबट्या अवतरल्याचे लक्षात येताच गौरव प्रचंड घाबरला. मात्र प्रसंगावधान राखत त्याने ट्रॅक्टरचा हॉर्न वाजवत तसेच रेस वाढवून मोठ्या आवाजात बिबट्याला
घाबरवण्याचा प्रयत्न केला. यामुळे बिबट्या काही क्षणातच अंधारात पळून गेला आणि मोठा अनर्थ टळला.
बिबट्या निघून गेल्याची खात्री झाल्यानंतर गौरव पवार याने तत्काळ वस्ती गाठून घटनेची माहिती ग्रामस्थांना दिली. तसेच रात्रीच्या वेळी शेतात
जाताना खबरदारी घ्यावी एकट्याने बाहेर पडू नये आणि परिसरात सतर्क राहावे, असे आवाहनही त्याने नागरिकांना केले. या घटनेनंतर हनुमानवस्ती व
परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. परिसरात सध्या ऊस व मका पिके उभी असल्याने बिबट्याला लपण्यासाठी मोठी सोय होत आहे. त्यामुळे
वनविभागाने गस्त वाढवावी, नागरिकांना मार्गदर्शन करावे व आवश्यक खबरदारीच्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे.
...